नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न असं म्हणतात अशीच काहीशी गत यंदाच्या वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकिच्या बाबतीत होत असल्याचे दिसून येते. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या प्रशासकीय राजवटीला नागरिक वैतागले असताना निवडणूक आयोग आणि शासनाने गोंधळात गोंधळ घातल्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुका निर्भिग्नपणे पार पडल्या नाहीत. राज्यातील 264 पैकी 24 नगरपालिकांच्या निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि अनगर नगरपालिकेचा समावेश आहे. उद्या राजभर सर्वत्र मतमोजणी होणार होती मात्र या मतमोजणीचा ब्रेक लागला असून सर्वच नगरपालिका तसेच नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. कोर्टाने आज निवडणूक आयोगाला देखील चांगलेच फटकारले. गेल्या चार वर्षापासून निवडणुका नाही आणि त्यातच कधी प्रभाग रचना, तर कधी आरक्षण याचा गोंधळात गोंधळ सुरू आहे. आता आज रात्री बंद होणारे ईव्हीएम चे मशीन तब्बल 21 दिवस स्ट्रॉंग रूम मध्ये तिहेरी सुरक्षा व्यवस्थेमध्ये ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. महायुती मधले जे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते त्याचा सस्पेन्स 21 डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे.

