कर्मप्रधान भक्तीचा पुरोगामी संदेश देणाऱ्या संत शिरोमणी सावता महाराजां च्या एकूणच जीवनप्रवासाचा वेध घेणारा हा लेखनप्रपंच ……..

0
50

महाराष्ट्र ही पराक्रमाची जन्मभूमी , पुरोगाम्यांची कर्मभूमी तसेच संतांची तपोभूमी राहिली आहे . रयतेचे राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींच्या पराक्रमाचे पवाडे याच भूमीत गाईल्या गेलेत . चार्वाक ,बुध्द, बसवेश्वर , चक्रधर ते फुले -शाहु – आंबेडकरांचं पुरोगामित्वही याच मातील रुजून सर्वत्र फोफावले . संतांनी उभारलेल मानवी मुक्तीच आंदोलनही याच मातील जन्माला येऊन महाराष्ट्राबाहेरच्या दूरवर राज्यात जाऊन विस्तारलं .
              इसवीसनाचे तेरावे शतक हे याच आध्यात्मिक व प्रबोधन क्षेत्रासाठी अत्यंत क्रांतीपर्व ठरले आहे . वारकऱ्यांच्या ज्ञान , भक्ती, वैराग्याच्या यशोमंदिरावरील सुवर्ण कळस म्हणजे पंढरपूर . येथील सावळ्या विठ्ठलाच्या गुणगाणातून संत वाङ्मय जन्माला आले .यातीलच ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेसह विविध संतांनी लिहिलेल्या अभंगगाथा आज मराठी साहित्य सृष्टीत सर्वव्यापी झाल्या आहेत .शके १२१२ ते १६०० हा संत कवींच्या मांदियाळीचा सर्वोत्तम कालखंड मानला जातो. त्यानंतर आलेल्या मोगल व यादव साम्राज्याच्या कालखंडातही संत मंडळी कार्यरत राहिलेली दिसते .
              परंपरेने चालत आलेल्या सनातन वैदिक धर्मात माजलेल्या कर्मकांडाना कंटाळलेल्या सामान्य माणसांनी सामाजिक समतेवर आधारित भागवत धर्माची कास धरून मोठे आध्यात्मिक बंड पुकारले ते याच शतकात . या बंडाचे खऱ्या अर्थाने शिलेदार होते ते संत नामदेव , तुकाराम , चोखामेळा ,रोहिदास , गोरोबा कुंभार , सावता माळी, विसोबा खेचर ,जनाबाई यांसारखे शुद्रातीशुद्र समाजातून आलेले कितीतरी वारकरी संत . “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ” किंवा “उच निच काही नेणे भगवंत ‘ असे समतेचे तत्वज्ञान मांडत या संतांनी महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायाची वाट अधिक प्रशस्त करून श्रध्दाळू व भोळ्या भाबडया सामान्यांना भक्ती सोपानाकडे नेण्याचे फार मोठे काम केले आहे . हीच भक्ती त्यानंतरच्या सामाजिक समतेच्या पायाभरणीस कारणीभूत ठरली.
              या सर्व संत मंडळींना तत्कालीन समाज जीवनात व ग्रामरचनेत मानाचे स्थान असल्यानेच अठरापगड जातीधर्माच्या लोकांनी या संतांनी स्वीकारलेल्या भागवत धर्माची पताका मोठया श्रध्देने आपल्या खांदयावर घेतली . तिचा प्रचार व प्रसार करत या संतांनी भागवत धर्माची ही समता पताका थेट महाराष्ट्राबाहेर असलेल्या कर्नाटक ते पंजाबातील घुमान पर्यंत नेऊन पोहचवली . ‘अनादिबहु काळा ‘ असलेल्या श्री विठ्ठलाला आपले परम् दैवत मानून या संतांनी विठ्ठलाच्या सावळ्या रुपालाच आपल्या अभंगातून सुंदर असे ‘ मनोहर ‘रुप बहाल केले .पंढरपुरातल्या एका विटेवर आपले दोन्ही हात कटेवर ठेऊन स्थिरावलेला श्री विठ्ठल या संतांना आता प्रत्यक्ष चक्रपाणी  वाटू लागला . त्या विठ्ठलाचे ” पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी I प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥” असे भक्तीपर वर्णन संत आपल्या अभंग रचनेत करु लागले. आणि पाहता पाहता हा सगुण, निर्गुण परमेश्वर थेट लाखों वारकऱ्यांच्या हदयस्थ झाला . येथील ज्ञानेश्वरादि संतांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ,अमृतानुभव ,अभंग ,भारुडे, कवणे व ओव्या यांसारख्या संत साहित्याने भागवत धर्माला तत्त्वज्ञानाची व्यापक अशी तात्विक बैठक मिळवून दिली. ज्ञान व भक्तीनिष्ठ असलेल्या याच तत्त्वज्ञानातून महाराष्ट्रात जमली ती इश्वरनिष्ठांची मांदियाळी . या मांदियाळीतील संतपरंपरेने जीव- जगत आणि परमेश्वर यांचे स्वरुप व सहसंबंध त्या विठ्ठलाशी जोडून सांस्कृतिक एकात्मतेवर आधारित एक मोठे ‘ भक्ती विद्यापीठच ‘ पंढरपूरात उभे केले . शब्दांतून ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या या परंपरेच्या भक्तीपथातील संत नामदेवांचे स्थान अगदी वरचे राहिले आहे . यातील अनेक संतांचा जीवनप्रवास हा हलाखी , छळ, चिकाटी , चमत्कतीपूर्ण व धाडसी राहिला आहे .        
              संत सावता महाराज हे त्यापैकीच एक थोर संतकवी . ते संत ज्ञानेश्वरांच्या समकालीन होते. इ.स. १२५० ते १२९५ हा त्यांचा कालखंड तर ज्ञानेश्वरांचा काळ इ.स. १२७५ ते १२९६ असा राहिला आहे. भक्ती संप्रदयात त्यांना मोठ्या आदराने ‘ संत शिरोमणी ‘ म्हटल्या गेले . मोटीवरच्या पाण्यावर थोडी बहुत ओलीताची शेती करणारे सावता महाराज स्वतःचा परिचय करून देतांना ” आमची माळीयाची जात I शेत लावूं बागाईत॥ ” असे म्हणत साऱ्या जगताची पोशिंदी असलेल्या काळ्या शेत माऊलीशी आपले नाते सांगताना दिसतात . याच अभंगाच्या शेवटच्या चरणात त्यांनी आध्यात्मिक ,सामाजिक असा बहुमोल संदेश दिला आहे. तो असा की, ” स्वकर्मात व्हावे रत I मोक्ष मिळे हातोहात . ” यातून सावता महाराजांचे व्यवहार चातुर्य व कर्म सिध्दांत दिसून येतो . ते आपल्या कामावर ठाम होते आणि त्यावरच त्यांची निष्ठा होती .आपल्या शेतीव्यवसायाशी ते प्रामाणिक होते . म्हणूनच त्यांनी आध्यात्म विचारांचा मळा स्वकष्टाने पिकवून त्यातील प्रेमरूपी जाई जुईच्या सुगंधाने  आसमंतासह सामाजिक मनही विशुध्द केले होते . शेती ही त्यांची प्रयोगशाळा होती . अज्ञाताचे सम्यक् दर्शन माती सारख्या ज्ञातांतून घडवण्याचे व्यावहारिक चतुर्य सावता महाराजांना प्रत्यक्षानुभूतीतून प्राप्त झाले होते . अज्ञानाने भेगाळलेल्या भुईवर अमृतसिंचन करत करतच त्यांनी आपल्या अभंगांचे चैतन्य गाईले आहे .सावता महाराजांचा हा व्यवहार व व्यवसाय मूर्ताकडून अमूर्ताकडे नेणारा आहे . त्यांना झालेली ज्ञान प्राप्ती ही प्रत्यक्षांतून झालेली असल्यानेच … त्याच्या मळ्यात ‘ विठ्ठल पायीं गोविला गळा ‘ ही स्थिती निर्माण झाली होती .
त्यांचे बध्दल स्वतः संत नामदेव महाराज एका स्तुतीपर अभंगात लिहितात …
           ” धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
             सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी ॥ “
            नामदेवांच्या या अभंगातून संत सावता महाराजांची जन्मभूमी अरण आणि त्यांची जातकुळी निर्देशित होते . सावता महाराजांच्या अभंग विचारांचा सूक्ष्मतेने अभ्यास केला तर ते आपणांस साध्याकडून समिश्राकडे , अनुभवांतून तर्कशुध्दाकडे , अनिश्चिताकडून निश्चिताकडे व विशेषांकडून सामान्याकडे घेऊन जात असल्याचा प्रत्यय येतो . त्यांचे अभंग विचार हे प्रत्यक्षानुभवाचे खडेबोल आहेत . त्यांचे उणेबुरे ३७ अभंग आहेत . पण त्यातील तारतम्य भावामुळे ते आध्यात्मिक कसोट्यांवर खरे उतरले आहे . या सर्व अभंगांना नव्याने उजाळा मिळावा , त्यांचा जीवनप्रवास सर्वांना कळावा याच भावनेतून ” अवघी विठाई माझी ” या ग्रंथाचे लेखन प्रयोजन आहे .                                                                                

              ० संत सावता महाराजांची आयुष्यगाथा ०

पंढरीच्या पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेले सावता महाराज आपल्या उत्कट अभंग रचनांसाठी प्रसिद्ध आहे . त्यांचं अरण गाव पंढरपूर पासून जेमतेम विसपंचवीस किलोमीटर अंतरावर आहे . सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेले अरण सावता महाराजांची जन्मभुमी व कर्मभुमी राहिल्याने ते जगाच्या नकाशावर आले .
वारकरी संप्रदायातील सर्वच संतांच्या पालख्या पंढरपुरला विठ्ठल दर्शनास जातात .परंतु ”स्वकर्मात व्हावे रत I विठ्ठल भेटें आपोआप ॥ ” अशी शीकवण देणाऱ्या सावता महाराजांच्या भेटीला स्वतः पांडुरंग अरणला येत असत . ही गोष्ट संप्रदायात ‘नवल केवढे केवढे ‘ अशीच म्हणावी लागेल .ही परंपरा गेल्या ७०० वर्षापासून अव्याहत सुरु असल्याने आजची पांडुरंगाची पालखी अरणला येत आहे .संतशिरोमणी सावता महाराजांचे गाव पंढरपूरपासून अवघ्या विस पंचवीस किलोमीटरवर असुनही कधीच सावता महाराज विठ्ठल दर्शनास गेले नाहीत. त्यांनी आपल्या कामातच विठ्ठल पाहिला.            
                अरण येथील दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा होत.ते स्वतः श्रध्दाळू असल्याने दरवर्षी पंढरीची वारी करायचे .  त्यांना पुरसोबा आणि डोंगरोबा अशी दोन मुले होती .पुरसोबा हे धार्मिक प्रवृत्तीचे होते . ते आपला पारंपारीक शेती व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करीत असत. विठ्ठलावरील श्रध्देमुळे ते पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावता महाराज जन्माला आले. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे असल्याची नोंद आहे. पुढे दैवू माळी हे अरण येथे स्थायिक झालेत.
                अरण पासून केवळ दोन मैलांवर असलेल्या भेंड गावच्या ‘भानवसे रूपमाळी’ या घराण्यातल्या जनाई नावाच्या मुलीशी सावता महाराजांचा विवाह झाला .जनाईंनी महाराजांचा तितकीच साथसंगत करत त्यांचा आयुष्यभर उत्तम संसार केला. त्यातून त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता महाराजांनी सेना न्हावी, नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. त्यामुळे तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची अधिकच भर पडली आहे . सावता महाराजांनी केलेल्या अभंग रचनांना काशीबा गुरव हे व्यवस्थित लिहून ठेवत असे .
भाषाशास्त्रानुसार ‘ साव’ म्हणजे ‘ खरे ‘ तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सांवरा हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले होते. शेतीत फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. आपल्या व्यवसायावर त्यांची फार मोठी निष्ठा होती . त्यांची तिच जीवननिष्ठा त्यांच्या पुढील …‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत ’ या  अभंगातून स्पष्टपणे दिसून येते ..
               ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.
               अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महारजांनी संजीवन समाधी घेतल्याचे मानले जाते. परंतु या तारखेबाबत संप्रदायात तर्कवितर्क असून कालनिर्णय दिनदर्शिकेत  त्यांची पुण्यतिथी २५ जुलै अशी दर्शवली आहे.
               सावता महाराज हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वारसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती. त्यामुळे पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटीसाठी येत असते. स्वत : पांडुरंग भेटीस येण्याइतका मोठा आध्यात्मिक अधिकार सावता महाराजांशिवाय अन्य कोण्या संतांना मिळाल्याचे ऐकिवात किंवा वाचनात आले नाही . केवळ पुंडलीका भेटीसच पांडुरंग गेल्याची संप्रदायीक मान्यता आहे .
               अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.

   ० संत सावता महाराजांचे अभंग ०
              ( अभग १ ते ३८ )
१ )कांदा, मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी || लसूण मिरची कोथंबिरी I अवघा झाला माझा हरी || मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी || सांवता म्हणे केला मळा Iविठ्ठल पायीं गोविला गळा ॥१॥

२)कां गा रुसलासी कृपाळू बा हरी । तुजविण दुसरी भक्ति नेणें ॥ दीन, रंक, पापी, दीन माझी मती । सांभाळा श्रीपती, अनाथनाथा || आशा, मोह, माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे || सांवता म्हणे देवा I नका ठेवुं येथे । उचलोनि अनंते नेई वेर्गी ॥२॥

३ )माझी हीन याति । तुम्ही उदार श्रीपती ।। नका देऊ भक्ति मुक्ति । माझी परिसावी विनंती || सांवता म्हणे पांडुरंगा । दुजेपण न्यावें भंगा || ३॥

४)भली केली हीन याति । नाही वाढली महंती || जरी असतां ब्राह्मण जन्म | तरी हे अंगी लागतें कर्म || स्नान नाहीं, संध्या नाही । याति कुळ संबंध नाहीं ॥। सांवता म्हणे हीन याति । कृपा करावी श्रीपती ||

५ )आमुची माळियाची जात | शेत लावूं बागाईत || आम्हां हाती मोट, नाडा पाणी जाते फुलझाडा || शांति-शेवंती फुलली प्रेम जाई-जुई व्याली ॥। सांवताने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा || स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातोहात ||५||

६ )नको तुझें ज्ञान, नको तुझा मान । माझें आहे मन वेगळेंचि ॥ नको तुझी भुक्ति, नको तुझी मुक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच || चरणीं ठेवुनि माथा, विनवितसे सांवता ।ऐका पंढरीनाथा, विज्ञापना ||६||
७ ) मागणें तें आम्हां नाही हो कोणासी । आठवावें संतांसी हेंचि खरें || पूर्ण भक्त आम्हां ते भक्ति दाविती । घडावी संगति तयाशींच || सांवता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ||७||

८ )ऐकावें हे विठ्ठल धुरे । विनंती माझी ही सत्वरें || करी संसाराची बोहरी I इतुकें मागतों श्रीहरी || कष्ट करितां जन्म गेला | तुझा विसर पडला ।। माळी सांवता मागे संतान । देवा करी गा निःसंतान॥

९ )विकासिले नयन स्फुरण आलें नाहीं । दाटले हृदयी करुणा-भरितें ॥ जातां मार्गी भक्त सांवता तो माळी। आला तया जवळी पांडुरंग || नामा, ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भीतरी गेला देव || माथा ठेओनि हात केला सावधान । दिलें आलिंगन चहूं भुर्जी || चरण ठेवोनि माथा, विनवितो सांवता । बैसा पंढरीनाथा, करीन पूजा I। ९ ॥
१० )पूर्वापार कुळ पंढरीचा नेम मुखीं सदा नाम विठ्ठलाचें । तारी अथवा मारी देवा, तूचि एक न घ्यावी भाक पांडुरंगा || वडिलांचा सेवा-धर्म अजुनि चालवि । व्यर्थ न भुलवी मायापाश ॥ सांवता म्हणे देवा, अखंड घ्यावी सेवा । आठव असूं द्यावां, माझा बाप ||१०||

११ )नामाचिया बळें न भिऊं सर्वथा कळिकाळाच्या माथा सोटे मारू || वैकुंठींचा देव आणूं या कीर्तनीं । विठ्ठल गाऊनी नाचों रंगी || सुखाचा सोहळा करूनी दिवाळी । प्रेमे वनमाळी चित्तीं धरूं || सांवता म्हणे ऐसा भक्ति-मार्ग धरा । तेणें मुक्ति द्वारा बोळंगती ।। ११ ।।

१२ )मंगल, मंगल नाम विठोबाचें । उच्चारिता जन्म खंडे | सुलभ, दुर्लभ ब्रह्मादिका वंद्य । वेदादिक शुद्ध गाती जया || सांवता म्हणे सर्व सुखाचे आगर । रुक्मादेवीवर विटेवरी ।। १२ ।।

१३ )एक नाम हरी, द्वैत नाम दुरी ।तोचि कल्पवरी चिरंजीव || ऐसा ज्या भार, नावाचे नारायण । नाहीं त्या बंधन कळिकाळाचें || न लगे सायास, न पडे संकट । नामे सोपी वाट, बैकुंठाची || सांवता म्हणे नर, तो प्रत्यक्ष पावन गाई रामकृष्ण सर्वकाळ ॥ १३ ॥

१४ )ज्या नामें तरले दोषी जे अपार । तोचि हा श्रीधर, कर कटीं || मौनेंचि उभा, मौनेंचि उभा विटेवरी । सांवता म्हणे ते जन्मा ये अंबरी ।। १४ ।।

१५ )दुजेपणाचा भाव । नको काही आन ठाव || सदा वाचें नामावळी । गर्जो नित्य वेळोवेळीं || सांवता म्हणे दयाघना | आठव मना असूं द्यावा ।। १५ ।।

१६ )विवाद करितां भागली दरुशनें । तेंचि आले कर्णे भीमा तीरीं ॥ पुंडलिक- पेठ रहिवासु केला । शब्द हा मिरविला विठ्ठलनामें || आषाढी कार्तिकी दोन्हीच में हाट वैष्णव भाट गर्जताती ।। १६ ।।

१७ )पुंडलिका भुलोनि आला । उमाचि ठेला अद्यापिही ।। येती जे जे दुराचारी । दरुशने उद्धरी नरनारी ॥
निवर्तन शिव, ब्रह्मा, विष्णु तिन्ही एक देव । जे निराकार सम्यक, विठ्ठल माझा || विठ्ठलनामाचा महिमा अगाध । होणें पूर्ण बोध ऐसा परी || अद्वैत वासना संतांची संगती । रायांची उपाधी बोलू नये ॥ हरी, मुकुंद, मुरारी हा मंत्र उच्चारी, सांवता म्हणें || १७||

१८ )विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती । अखंड श्रीपती हेंचि द्यावें || ध्यान, मन, वर्नी असती सर्वकाळ । साधी काळ वेळ याची परी || नाम हे तारक साचार जिवांचे । सांवता म्हणे वाचे सदा घेई ||१८|

१९ )मागें बहुतांचा लाग । तोडिला पांग, तुम्ही देवा || म्हणोनि येतो काकुळती पुढती पुढती कीव भाकी ।। सांवता म्हणे विश्वंभरा | तुम्ही उदारा त्रिभुवनी || १९ ||

२० )उचित जें तुम्हा गोडी । आवडे जगजेठी करतों || वास देई चरणापाशी हेंचि तुम्हांसि मागतों ।। कन्या पुत्र यांचा भाग तोडा तोडा हा लिगाड || माळी सांवता लागे चरणीं । करी विनवणी विठ्ठल ।। २० ।।

२१ )कृपाळू तू हरी दीन दासातें उद्धरी || नको काही दुजा हेत सदा जडो नामी चित्त ॥ दुजे आणिक नको काही ठाव द्यावा संतापायीं ॥ माळी सांवता विनवितो परिसा परिसा तुम्ही हरी ।। २१ ।।

२२)भंगो नेदी माझे प्रेम चालवावा हाचि नेम || ऐक दयाघना देवा । कोण भाग्य तुझी सेवा || तुझे सेवेवांचूनी कांही पाहता सुख कोठें नाही ।। अगा रुक्मिणी- रमणा सांवता विनवितो चरणा || २२||

२३)विश्रांतीचा ठाव | पंढरीराव विटेवरी ।। धावोनिया जाईन गांवा । अवघा हेवा चुकवील !! दरुशने होय लाभ नमानभ दाटणी || सांवता म्हणे जन्म व्याधी । तटे उपाधी कर्माची ।। २३।।

२४)वेद, श्रुती, शास्त्र, पुराणे श्रमलीं। परि तथा विठ्ठल गम्य नाही ।। ते या पुंडलिका सुलभ पै जाहलें । उद्धरावया आलें भीमातटी || सांवता म्हणे विठ्ठल दयाळ । लागो नदी मळ भाविकांसी ।। २४ ।I

२५ )ते उभे असे ठेलें विटेवरी || डोळियांचे धनी पाहतां न पुरें । गोळी तें साजिरे खेळविती ॥ आगमा न कळे, निगमा वेगळें । गोकुळी लोणावळें चोरितसे || सांवता म्हणे ज्याचा न कळेचि पार । तो हरी साचार चारी गाई ।। २५।।

२६ )पैल पहा हो परब्रह्म भुललें । जगदीश काहो परतंत्र झाले || काय सुख केलें नेणिजे । कोण भाग्य गौळीयाचे वार्णिजे || आदि अंतू नाहीं जया व्यापका I माया उखळीं बांधिला देखा || सर्व सुखाचें सुख निर्मळ । कैसे दिसताहे श्रीमुखकमळ || योगियां हृदय कमळीचे हें निधान | दृष्ट लागे झर्णी उतरा निंबलोण || सांवता स्वामी परब्रह्म पुतळा । तनुमनाची कुरवंडी ओवाळा ||२६||

२७ )योग, याग, तप, धर्म सोपें वर्म नाम घेतां ॥ तीर्थ, व्रत, दान, अष्टांग याचा पांग आम्हां नको || समाधी आणि समाधान | तुमचे चरण पाहतां || सांवता म्हणे दया क्षमा हेचि तुम्हां उचित ।। २७॥

२८)साधनांची आटाआटी । कासया पाठीं लावितां ।। एक तुमचें नामचि पुरें । हेंचि धुरें साधन || भाळी-भोळी करीन सेवा माना देवा, तुम्ही धन्य ॥ सांवता म्हणे रुक्मिणीवरा अहो अवधारा वचन माझे ।। २८॥

२९)नेणो योग याग तपें वाचे जपें विठ्ठल || हेचि आमुचें निजधन सुखसंपन्न विठ्ठल ।। न लगे संपत्ति मान । धन आम्हां परिपूर्ण विठ्ठल || सांवता माळी म्हणे देवा । मज निरवा संतांपायी ॥ २९॥

३०)जपतप, क्रिया, धर्म-साधन वाउगे बंधन उपाधीचें || येणें काय घडे समाधान सर्वथा । वाउगाची शीण व्यथा होत आहे ।। सांवता म्हणे सार. कांहीं धरा नाम नको दुजा नेम वाउगाची ।। ३० ।।

३१)विश्रांति सुखासि सुख पै जाहलें ।लागला कपाळीं । कोण तुटी करी त्यासी || ऐका ऐका पंढरीनाथा निवारा भयापासूनी || नको नको या उपाधी जोडा संधि काळचक्र || सांवता म्हणे करुणाकरा । अहो श्रीधरा दयाळा ॥

३२ )अकराच्या माथा नकार बैसला। लकार भारला मिथ्या पाही || ऐसा तो उमज नाही या मानवा उगाच वणवा लागे देहीं ॥ विषर्थी गुंतला, नाहीं केलें ध्यान पातकीं दुर्जन अविचारी || सांवता म्हणे भजन करावें देवाचें योगयाग तयांचे कष्ट बहु ।। ३२ ।।

३३)प्रपंची असून परमार्थ साधावा वाचें आठवावा पांडुरंग ॥ उंच-नीच काही न पाहे सर्वथा पुराणींच्या कथा पुराणच ।। घटका आणि पळ साधी उतावीळ । वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥ सांवता म्हणे कांते, जपे नामावळी | हृदयकमळीं पांडुरंग ३३॥

३४)प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोटी वासनेची बेडी पडली पायां ॥ सोडवण करा आलेनि संसारा । शरण जा उदारा देवराया || प्रबळ मोहपाश विषयासी गोंवी अखंड भोगवी क्लेश नाना || सांवता म्हणे तुम्ही विचारावे मनीं सोईरा निर्वाणी हरि एक ।। ३४ ।।

३५)जगीं तारक एक नाम । उत्तम धाम पंढरी । चला जाऊं तया गावा पाहूं देवा विठ्ठला ।। बिंदू संत चरण रज तेणें काज आमुचें || सांवता म्हणे विटेवरी । उभा सम चरण हरी ||३५|

३६)समयासी सादर व्हावें देवें ठेविले तैसे राहावें । कोणे दिवशी बसून हत्तीवर कोणे दिवश पालखी सुभेदार ।
कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावें || कोणे दिवशी बसून याची मन । कोणे दिवश घरात नाही धान्य ।
कोणे दिवशी द्रव्याची सांठवण कोठे साठवावे ।। कोणे दिवशी यम येती चालून। कोणे दिवशी प्राण जातीं घेऊन ।। कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटें रहावें ||
कोणे दिवशी होईल सदगुरुची कृपा I कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा || कोणे दिवशी सांवत्याच्या बापा दर्शन द्यावें ॥ ३६
३७)मागणे ते आम्हा नाही हाे काेणासीं Iआठवावे संतांसी हेचि खरे II

पुर्ण भक्त आम्हां ते भक्ती दाविती | घडावी संगती तयाशीच ॥

सावता म्हणे कृपा करि नारायणा I देव ताेचि जाणा असे मग ॥

३८)शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक, जे निराकार सम्यक विठ्ठल माझा 

मागणे ते आम्हा नाही हाे काेणासीं, आठवावे संतांसी हेचि खरे 

पुर्ण भक्त आम्हां, ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच 

सावता म्हणे कृपा करि नारायणा, देव ताेचि जाणा असे मग
विठ्ठल नामाचा महिमा अगाध, हाेणे पुर्ण बाेध ऐशा परी 

अद्वैत वासना संतांचि संगती, रायांची उपाधी बाेलू नये 

हरि मुकुंद मुरारी,हा मंत्र उच्चारि,  सावता म्हणे ॥

संत शिरोमणी सावता महारांजाच्या ७२८ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्य ही शब्दपुष्पमाला महाराजांच्या चरणी अर्पण करतो . माझ्या ‘ अवघी विठाई माझी ‘ या आगामी पुस्तकातले हे प्रकरण आहे .