यवतेश्वर घाटातील धोकादायक दरड सोमवारी पाडणार;  ‘इर्शाळवाडी’ ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

0
33

सातारा ( सुधीर गोखले) – जिल्हा प्रशासन महसूल विभाग आणि बांधकाम विभागाकडून सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि संभाव्य भुस्कलन प्रवण क्षेत्र तसेच दरड कोसळण्याची धोकादायक ठिकाणावरील २२ गावातील तब्बल ३७० ग्रामस्थांना खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरत्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. सध्या जिल्ह्यातील पावसाचा जोर बघता कास पठाराकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटामधील धोकादायक दरडी काढण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभागामार्फत हाती घेण्यात येणार असल्याने आज रविवारी रात्री १२ पासून सोमवारी रात्री १२ पर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार  आहे. इर्शाळवाडी च्या घटनेनंतर सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी हे स्वतः आपत्कालीन यंत्रणेबरोबर सातत्याने संपर्क ठेऊन आहेत जिल्ह्यामध्ये डोंगरदऱ्यांच्या प्रमाण जास्त असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग सतर्क आहे.

प्रत्येक तालुक्यात जेसीबी पोकलँड यासारख्या अत्याधुनिक साधनसामग्रीसह प्रशासन सज्ज आहे. नुकतीच पाटण तालुक्यातील चाळकेवाडी चिखली रस्त्यावर पडलेली दरड तातडीने हटवण्यात आली. त्याचप्रमाणे यवतेश्वर घाटात असलेला धोकादायक सुळका सोमवारी उतरवण्यात येणार आहे पण खबरदारी म्हणून हा घाटमार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे प्रांताधिकारी सुधाकर भोसले आणि बांधकाम विभागाचे प्रशांत खैरमोडे यांनी जागेची पाहणी केली हा सुळका कदाचित पावसामुळे कोसलाच तर या डोगर पायथ्याशी असणाऱ्या शेतीवाडी मध्ये जाऊ शकतो तसेच वित्त अथवा जीवित हानी होऊ नये यासाठी हा उपाय करण्यात येणार आहे. तात्पुरत्या निवारा शेड मध्ये स्थलांतरित नागरिकांना पुरेसा धान्यसाठा विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला आहे जर गरज भासलीच तर आणखी भूखंड आरक्षित करून निवारा शेड उभे केले जाणार आहेत.