हातभट्टी दारु वाहतूकीला दणका राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0
35

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (ता. 18 जुलै) रात्रीच्या सुमारास कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथे एका जीपमधून वाहतूक होणारी चौदाशे चाळीस लिटर हातभट्टी दारु जप्त केली. सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरिक्षक ब विभागाच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार त्यांनी मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावाच्या हद्दीत सोलापूर-पुणे हायवेवर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना महिंद्रा क्रुझर जीप क्र. MH-13-AU-0176 या वाहनाला अडवले असता जीपचालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात सोळा रबरी ट्युबमध्ये अंदाजे 90 लिटरप्रमाणे चौदाशे चाळीस लिटर हातभट्टी दारु आढळून आली. फरार इसमाविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वाहनाच्या किंमतीसह एकूण रु. पाच लाख त्र्याहत्तर हजार सहाशे किंमतीचा मुद्देमाल विभागाने हस्तगत केला आहे. ही कारवाई अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उप-अधीक्षक तथा निरिक्षक ब विभाग सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक रोहिणी गुरव, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहनचालक रशिद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवर छापे टाकण्यासोबतच हातभट्टी दारुच्या वाहतूक व विक्रीवर कडक लक्ष ठेवून कारवाई करण्यात येत आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 97 गुन्हे दाखल केले असून 8400 लिटर हातभट्टी दारु, 58100 लिटर गुळमिश्रित रसायन, 110 लिटर देशी दारु, 310 लिटर ताडी, इतर साहित्य व बारा वाहने असा एकूण तीस लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आवाहन
कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.