सोलापूर महापालिकेच्या प्रशासनामध्ये बदल करणे मोठे चॅलेंज बनले आहे. यामुळे महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे देखील हतबल झाले आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुमारे 60 कोटी रुपये खर्चून उभारलेले शहरातील कमांड अँड कंट्रोल सेंटर च्या मॅनेजमेंटचे सर्व देखभाल दुरुस्ती आणि ऑपरेशनचे काम अलाईड सोल्युशन या मल्टिनॅशनल कंपनीला देण्यात आले होते. दरमहा तीस लाख रुपये बिल स्मार्ट सिटी कडून या कंपनीला नियमितपणे दिले जायचे. मात्र स्मार्ट सिटी चे सर्व अधिकार आणि निधी महापालिकेकडे वर्ग झाल्यामुळे आता महापालिकेच्या स्टाईलने काम सुरू आहे. गेल्या नऊ महिन्यापासून या कंपनीचे महापालिकेने पेमेंट केले नाही. त्यामुळे आता ही कंपनी गाशा गुंडाळण्याचा विचार करत आहे.
महापालिकेने बिल न दिल्यामुळे अलाईड कंपनीने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना सात ते आठ महिन्यापासून पगार दिला नाही. महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी पदमगोंडा आणि मतीन यांना पाठीमागील प्रलंबित बिले तातडीने अदा करावीत असे आदेश दिले. मात्र या दोघांनीही आयुक्तांचे आदेश अद्याप पाळले नाहीत. एग्रीमेंट नुसार 45 दिवसात बिल अदा करणे बंधनकारक असताना महापालिकेचे काही क्लर्क आणि अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात. सोलापूर शहरातील 331 सीसीटीव्ही कॅमेरे मॉनिटरिंग करणे तसेच दुरुस्त करणे हे देखील या कामाचा भाग आहे. अलीकडच्या काळात काही कॅमेरे बंद असल्यामुळे कंपनीला दंड देखील करण्यात आला. मात्र त्या नावाखाली जानेवारी महिन्यापासूनची बिले या दोघांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली आहेत. यावरूनच महापालिका कारभार कसा चालतो हे लक्षात येईल.










