राष्ट्रीय हातमाग दिनाच्या औचित्याने राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरची जागतिक ओळख असलेल्या हातमाग परंपरेचे प्रतीक मानली जाणारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. या आगळ्यावेगळ्या भेटीने सोलापूरच्या हातमाग उद्योगाची परंपरा, कौशल्य आणि सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय स्तरावर विशेष अधोरेखित करण्यात आले. एनडीएच्या नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी आयोजित विशेष अल्पोपहार कार्यक्रमात डॉ. ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधानांना ही अनोखी भेट सुपूर्द केली. सोलापुरी चादरीवरील स्वतःची प्रतिमा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अप्रतिम कलाकृतीचे आणि सोलापूरच्या हातमाग परंपरेचे मनापासून कौतुक केले सोलापूरच्या विणकरांनी जपलेले कौशल्य हे देशाची अमूल्य परंपरा असल्याचे सांगत, सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला नवउर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक पावले उचलेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी सोलापुरी चादरीचे आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डिंग करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष धोरण आखावे, अशी ठाम मागणी केली. सोलापुरी चादरीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्यास सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला नवी चालना मिळेल, हजारो हातमाग कामगार, विणकर, लघुउद्योजक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचावेल, असे त्यांनी पंतप्रधानांना सांगितले. सोलापुरी चादर हा केवळ एक उत्पादन नसून सोलापूरच्या अस्मितेचा आणि श्रमसंस्कृतीचा जागतिक ब्रँड आहे, असेही त्यांनी नमूद केले.


















