सोलापूर विद्यापीठ व सोलापूर जिल्हा महाविद्यालय सेवक संयुक्त कृती समिती

0
19

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्रित संपावर २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार, २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर कल्याण येथे झालेल्या सेवक संयुक्त कृती समितीच्या बैठकीत निर्णय

सोलापूर । राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रमुख सहा मागण्यासाठी २ फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड व विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन करणार असल्याची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे, अशी माहिती सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, सचिव रविकांत हुक्केरी आणि कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले, सचिव राजेंद्र गिड्डे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आधिक माहिती सांगताना ते म्हणाले, कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरविले असून कर्मचारी त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करतील. राज्य शासनाने याची दखल घेतली नाही तर २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटनानी स्वतंत्रपणे आंदोलने केली होती. परंतु आश्वासनाशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे प्रथमच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले आहेत. त्यामुळे ‘उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील परीक्षेची यंत्रणा कोलमडणार आहे. याची नोटीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना १३ जानेवारीच्या पत्राने दिली आहे.