कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची 524.26 मीटर पर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यास मान्यता दिली आहे . याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना ही शासनाने दिल्या आहेत.
अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने, या प्रस्तावाला विरोध आहे .आमदार अरुण लाड यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी केली होती त्याची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतलाय. कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची 524.26 मीटर पर्यंत वाढवण्याची कार्यवाही सुरू असून हा निर्णय कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाच्या निर्णयाविरोधात असल्याचा महाराष्ट्राचा आक्षेप आहे. महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायालयीन हस्तक्षेप मिळवावा अशी मागणी आमदार अरुण लाड यांनी यावेळी केली..











