सोलापूर- राज्य शासनाने मंजूर केलेला कृषी विभागाचा नवा आकृतीबंध रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व कार्यालयीन सोशल मीडिया समूहांमधून एकाच वेळी एक्झिट घेतली आहे. यामुळे विभागातील कामकाजाच्या सूचनांचे आदान-प्रदान पूर्णपणे ठप्प झाले आहे.
राज्यातील सहा प्रमुख संघटनांनी एकत्र येत या आंदोलनाची हाक दिली आहे. पहिल्या टप्प्यात व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर बहिष्कार टाकल्यानंतर, आंदोलनाचा पुढील भाग म्हणून २८ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत कामकाज केले जाईल. तसेच शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास ४ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.











