रे नगरचा गृहप्रकल्प हा देशातील सर्वोत्कृष्ट गृह प्रकल्प असेल – संजीव जयस्वाल

0
22

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीस हजार घरकुलांचा प्रकल्प रे नगर येथे राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वाटप प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते पुढील तीन महिन्यात होणार

सोलापूर, दि. 18 (जिमाका):- केंद्र व राज्य शासन रे नगर गृह प्रकल्पाच्या माध्यमातून 30 हजार बेघर नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. शासनाच्या वतीने या गृह प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, हा प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट गृहप्रकल्प असेल याची खात्री म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जयस्वाल यांनी दिली.

रे नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गृहप्रकल्प पाहणीच्या वेळी आयोजित कार्यक्रमात श्री. जयस्वाल बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, माजी आमदार नरसय्या आडम, रे नगर सोसायटीच्या चेअरमन नलिनताई कलबुर्गी, नगरसेविका कामिनीताई आडम, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे यांच्यासह म्हाडाचे अन्य अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयस्वाल पुढे म्हणाले की, 30 हजार बेघरांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर देण्याचा हा रे नगरचा प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून यात पंधरा हजार लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या प्रकल्पासाठी माननीय प्रधानमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत. सर्व संबंधित विभागाने या पहिल्या टप्प्याची कामे विहित वेळेपूर्वी पूर्ण करून देण्यासाठी अधिक गतीने काम करावे. तसेच या प्रकल्पात केंद्र व राज्य शासन यांच्या वतीने रस्ते, वीज, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था आदि सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शासन व प्रशासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जात असून, येथे वास्तव्यास येणाऱ्या सर्व नागरिकांनी या परिसरातील स्वच्छता चांगली ठेवावी असे आवाहन करून हा गृह प्रकल्प देशातील सर्वोत्कृष्ट गृहप्रकल्प असेल याची खात्री त्यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले कामे पूर्ण करण्यात येत आहेत. तसेच जिल्हा परिषदेने रस्त्याच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव म्हाडाकडे त्वरित पाठवावा. तसेच या गृह प्रकल्पातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून महिला बचत गट स्थापन करावेत व या महिलांचे उत्पन्न पुढील वर्षभरात दुप्पट करण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रयत्न करावेत व या कुटुंबांना आर्थिक स्वावलंबी करावे, असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.

रे नगर गृहप्रकल्पाचा भाग होण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली असून या ठिकाणी राहिला येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करेल. तसेच या प्रकल्पातील उर्वरित सर्व कामे लवकर मार्गी लागण्यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य ती दक्षता घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत रे नगर भागातील महिलांना एकत्रित करून त्यांचे बचत गट स्थापन करण्यात येतील. त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील व हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी यावेळी दिली.

देशातील प्रत्येक बेघराला स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे स्वप्न देशाचे प्रधानमंत्री महोदय यांचे आहे. या गृह प्रकल्पाचा पहिला टप्पा पुढील दोन तीन महिन्यात पूर्ण होत असून 15 हजार घरकुलांचे वाटप करण्यासाठी स्वतः प्रधानमंत्री महोदय येथे येत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सांगितले. तसेच या गृह प्रकारच्या कामकाजाची माहिती देऊन वीज वितरण कंपनीच्या प्रत्येक कनेक्शनसाठी 9 हजार रुपये या प्रकल्पातील गोरगरीब लाभार्थी देऊ शकत नसल्याने याबाबतची सोय शासनाने करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रारंभी श्री. जयस्वाल यांनी रे नगर गृहप्रकल्पासाठी करण्यात येत असल्यास सांडपाणी प्रकल्प कामकाजाची प्रत्यक्ष साईटवर जाऊन पाहणी केली. तसेच रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कामाची माहिती घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रे नगर सोसायटीचे सचिव युसुफ शेख मेजर यांनी केले तर आभार चेअरमन नलिनताई कलबुर्गी यांनी मानले.