जिल्हाधिकारी कार्यालयात रे नगर आढावा बैठक

0
18

म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रे नगर गृहप्रकल्प कामकाजाच्या आढावाबाबत सविस्तर बैठक घेतली. पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे वाटप प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते पुढील दोन ते तीन महिन्यात होणार असल्याने सर्व संबंधित यंत्रणांनी राहिलेली कामे त्वरित मार्गी लावण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. रे नगरला जाणाऱ्या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषदेने त्वरित प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली. भूसंपादनासाठी आवश्यक असलेला निधी म्हाडामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

रेनगर या भागात जिल्हा परिषदेने पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळा सुरू करण्याबाबत सर्व तयारी पूर्ण करून ठेवावी, अशी सूचना श्री. जयस्वाल यांनी केली. या ठिकाणी रस्त्यावरील लाईटबाबत वीज वितरण कंपनीने आवश्यक ती कार्यवाही करून वीज पुरवठा करण्याबाबत काम सुरू करावे. रस्ते वीज पुरवठा व सांडपाणी व्यवस्था यासाठी आवश्यक असलेला निधी म्हाडामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तर माजी आमदार नरसय्या आडम यांनी रे नगर मध्ये अपूर्ण असलेल्या कामांची तसेच रस्त्यावरील वीज पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छता आदि कामांची माहिती देऊन ती कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली.