हॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या ‘आरआरआर’चा बोलबाला; ऑस्करआधी केला नवा विक्रम

0
79

हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या ‘आरआरआर’ या सिनेमाने तीन पुरस्कार पटकावले आहेत.

एसएस राजामौलींच्या ‘आरआरआर’ या सिनेमाचा हॉलिवूडमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘ऑस्कर 2023’च्या नामांकन यादीत समावेश झालेल्या या सिनेमाने आता आपल्या नावे आणखी एक विक्रम केला आहे. हॉलिवूडच्या मानाच्या ‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार ‘आरआरआर’ने बाजी मारली आहे. 

सातासमुद्रापार ‘आरआरआर’चा डंका 

‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या’त राजामौलींच्या ‘आरआरआर’ या सिनेमाने तीन पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कार सोहळ्याला राजामौली  आणि राम चरण यांनी हजेरी लावली होती. पुरस्कार पटकावल्यानंतर आपला आनंद व्यक्त करतानाचा राजामौलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

‘हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या’त ‘आरआरआर’ या एकमेव भारतीय सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट गाणी, सर्वोत्कृष्ट एडिटिंग, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळाले होते. 

एचसीए पुरस्कार सोहळ्यात ‘एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल अॅट वन्स’ या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले होते. तब्बल 17 कॅटेगरीमध्ये या सिनेमाला नामांकन मिळाले होते. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट एडिटिंग आणि सिनेमातील एका अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.  ‘आरआरआर’ या सिनेमात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत. एसएस राजामौलीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमकूळ घातला होता. सिनेमातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीत ऑस्करचं नामांकन मिळालं आहे. हा पुरस्कार सोहळा 12 मार्चला पार पडणार आहे.