सोलापूर : उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगाच्या रुग्णांवरील उपचारांमध्ये समन्वयपूर्ण दृष्टिकोन विकसित करण्यासाठी रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) सकाळी सोलापुरात वैद्यकीय शिक्षणविषयक सीएमई (CME) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या (NIMA) सोलापूर शाखेच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात सामान्य वैद्यकीय व्यावसायिकांना जोखमीच्या प्रसूती व हृदयरुग्णांच्या उपचारांबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. स्नेहल पवार आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद पवार यांनी उच्चजोखमीच्या रुग्णांच्या उपचारांमधील अनुभव आणि विविध गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रकरणांची माहिती दिली.
कार्यक्रमात एसीएस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आलेल्या विविध रुग्णांच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये हृदयाच्या डाव्या कप्प्याची कार्यक्षमता कमी असताना आणि अॅट्रियल टॅकीकार्डिया असताना सिझेरियन प्रसूतीचे व्यवस्थापन, संधिवातजन्य हृदयरोग असलेल्या गर्भवतीची प्रसूती, प्रसूतीनंतर रक्तवाहिनीत रक्ताची गुठळी होण्याच्या (DVT) समस्येवरील उपचार तसेच उच्चजोखमीच्या वयोवृद्ध रुग्णामध्ये गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेचे व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता.
गंभीर रुग्णांवर उपचार करताना स्त्रीरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. वेळेवर निदान, जोखमीचे अचूक मूल्यमापन आणि योग्य उपचारपद्धती यांमुळे रुग्णांच्या उपचारांचे परिणाम सुधारण्यास मदत होते, यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला. तसेच प्रसूती ही नैसर्गिक प्रक्रिया असून डॉक्टरांचे कार्य त्याला सुलभ करणे गुंतागुंत टाळणे एवढेच आहे. गरोदर स्त्रीला मॅटर्निटी होम हे माहेर वाटले पाहिजे असे नैसर्गिक वातावरण निर्माण करून प्रसूती आजार न वाटता मातृत्वाचा आनंद देणारी प्रक्रिया व्हावी यासाठी डॉक्टरांनी औषधासोबत रुग्णाला योग्य सल्ला ,आहार आणि योग , आयुर्वेद यातील फायदेशीर गोष्टीचे मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
हा कार्यक्रम NIMA सोलापूर शाखा, इशा नर्सिंग होम, डॉ. पवार कार्डियाक अँड मॅटर्निटी क्लिनिक आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यावेळी निमा सोलापूरचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जीड्डीमनी, सचिव डॉ. अभिजीत पुजारी, कोशाध्यक्ष डॉ. प्रवीण ननवरे, वुमेन्स फोरम अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे, सचिवा डॉ. पल्लवी भांगे, ट्रेझरर डॉ. अश्विनी देगावकर, डॉ. राजश्री मठ यांच्यासह सोलापुरातील नामवंत डॉक्टर उपस्थित होते.










