कोणाचीही शिफारस चालणार नाही, आता बदल्या App द्वारे होणार : तानाजी सावंत

0
19

येस न्युज नेटवर्क : अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्यांच्या संदर्भात आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागाच्या सर्व बदल्या ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून होणार आहेत. आरोग्य विभागाच्या बदल्यांच्या संदर्भात कोणाचंही शिफारस पत्र चालणार नाही. बदल्यांमागील अर्थकारण थांबवण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी आरोग्य विभाग अद्यावत डिजिटल अॅप तयार करणार आहे. ज्याला बदली करुन घ्यायची आहे त्याने स्वतः या अॅपवर तीन पर्याय द्यायचे आहेत. त्यामधून मेरिटवर डिजिटल पद्धतीने बदली होणार आहे, असं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
अ दर्जापासून ड दर्जापर्यंत सगळ्यांच्या म्हणजे अगदी संचालकपदापासून एमबीबीएस डॉक्टर, उपजिल्हा रुग्णालयातील नर्सेस पदापर्यंतच्या बदल्या आम्ही अॅपद्वारे ऑनलाईन करणार आहोत. कोणाची चिठ्ठी नाही, कोणाचा वशिला नाही, कोणाला भेटायचं नाही. एक अॅप डेव्हलप केलेलं असेल, महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे ज्याला तीन वर्षे झाले आहेत, त्याचं सध्याचं जे ठिकाण आहे, ते सोडून त्याने स्वत:च्या आयडीवरुन तीन प्रेफरन्सेस द्यायचे. हे ठिकाण सोडल्यानंतर त्याला कोणतं ठिकाण अपेक्षित आहे, कुठलं ठिकाण हवं आहे. त्याचे तीन पर्याय द्यायचे. आम्ही एक ठराविक कालावधी दिला आहे. यामध्ये त्याने हे पर्याय अपलोड करायचे. या कालावधीनंतर ही प्रोसेस संपेल आणि कुठे बदली झाली हे त्याच्या आयडीवर दिसेल. तिथेच त्याला कळेल की या ठिकाणी त्याची बदली झाली आहे, असं तानाजी सावंत यांनी सांगितलं. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे धोरण राबवलं जात आहे. हे धोरण पारदर्शक आहे. यामुळे इथे काम करणारे लोक समाधानी होतील. यामुळे त्याचा आत्मविश्वास, स्वप्रेरणा वाढेल. यामधून वाद निर्माण होण्याचा संबंधच नाही, असंही तानाजी सावंत यांनी नमूद केलं.