पंढरपूर तालुक्यातील मौजे आंबे येथे १५ नोव्हेंबर २०२६ रोजी शेतातील विहिरीच्या खोदकामादरम्यान माती व दगडाचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज रांजणी व अनवली येथे भेट देऊन मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
या दुर्घटनेत मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे (रा. रांजणी) तसेच तानाजी घोडके आणि आबा घोडके (रा. अनवली) या चार कामगारांना आपला जीव गमवावा लागला. हे सर्व कामगार मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे चारही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुटुंबातील कर्त्या व्यक्तींच्या निधनाने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी शोकाकुल कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या दुःखात सहभागी असून, कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दरम्यान, या दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत तातडीने मिळावी, यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत मंजूर करावी आणि संबंधित कुटुंबीयांना मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशीही मागणी केली आहे.
जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी केवळ आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन न देता, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चारही कामगारांच्या मुलामुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची ग्वाही दिली. त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके आणि आबा घोडके या चारही कामगारांना खासदार प्रणिती शिंदे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शोकाकुल कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे सरपंच दादासाहेब ढोले काँग्रेस तालुका उपाध्यक्ष सादिक मुलानी फारूक बागवान यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.














