घराणेशाही बाबत काँग्रेसला हिणवणाऱ्या भाजपने काँग्रेसचा कित्ता गिरवत घराणेशाहीला प्रोत्साहन दिले आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत ते आता दिसू लागले आहे. ज्यांनी डीसीसी बँकेची कोट्यावधी रुपयांची कर्जे घेतली आणि ती थकीत ठेवली आणि बँकेला अडचणीत आणले, अशा बड्या नेत्यांचे अर्ज कोर्टाने बाद ठरविले. असे असतानाही भाजपने त्यांच्याच नेत्यांच्या मुलांना डीसीसी बँकेच्या संचालक पदाच्या उमेदवारी बहाल केल्या. एवढेच नव्हे तर एका एका घरात दोन दोन संचालक नेमले दिले. त्यामुळे शेतकऱ्यांची ही बँक मूठभर लोकांच्या आणि त्याच त्या लोकांच्या हातात गेली आहे. 19 जागापैकी 10 जागा बिनविरोध झाल्यामुळे भाजपचाच चेअरमन होणार हे नक्की आहे. 26 नोव्हेंबर रोजी उर्वरित नऊ जागांसाठी मतदान होणार आहे.भाजप प्रणित उमेदवारांना मोहिते पाटील गटाच्या पुढाकाराने स्वाभिमानी पॅनल उभा करून चॅलेंज दिले आहे. माजी आमदार तसेच डीसीसी बँकेचे माझी चेअरमन राजन पाटील यांची दोन्ही मुले बाळराजे आणि अजिंक्यराणा हे बिनविरोध निवडले गेले आहेत. माजी आमदार दिलीप माने यांनी मुलगा पृथ्वीराज, डीसीसी बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांनी मुलगा श्रीदीप, माजी आमदार संजय मामा यांनी स्वतःचा मुलगा यशवंत शिंदे, माजी संचालक बबनराव अवताडे यांनी स्वतःचा मुलगा सिद्धेश्वर, यांना बिनविरोध निवडून आणले आहे, आता आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष यांचा सामना बँक व पतसंस्था मतदारसंघात महापालिकेतील नगरसेवक अमोल शिंदे यांच्याशी होणार आहे. माळशिरस सोसायटी मतदारसंघात अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना त्यांचे निकटवर्तीय शहाजीराजे देशमुख यांनी भाजपकडून चॅलेंज दिले आहे. माजी आमदार दिगंबर बागल यांच्या पत्नी शामल यांना अस्मिता गायकवाड,सिंधू पाटील आणि अर्चना घोडके यांच्याशी सामना करावा लागणार आहे. माजी आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजीत यांना मोहिते पाटील गटाचे संग्रामसिंह जहागीरदार यांच्याबरोबर लढत द्यावी लागत आहे. माजी आमदार दीपक साळुंखे यांचा मुलगा सूर्यादत्त याला दुग्धविकास मतदारसंघातून शिवाजी पाटील यांच्याबरोबर लढाई करावी लागणार आहे. एकूणच या डीसीसी बँकेवर भाजपचेच वर्चस्व राहणार असून आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यापैकी कोण चेअरमन होणार याची उत्सुकता लागली आहे.









