सोलापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत २८ जून २०२६ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या (MAHATET) सुयोग्य नियोजनासाठी आज दि. ०३ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली.
या परीक्षेसाठी सोलापूर शहरात एकूण ४७ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, यामध्ये पेपर-१ साठी १२,२६१ आणि पेपर-२ साठी १६,०३७ असे एकूण २८,२९८ परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहेत.
ही परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी या बैठकीत खालील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले:
- अधिकारी नियुक्ती: परीक्षा केंद्रांवर सहाय्यक परिरक्षक व क्षेत्रीय अधिकारी म्हणून राजपत्रित क्षेत्रीय अधिकारी (वर्ग-१ किंवा वर्ग-२), अधिव्याख्याता, किंवा प्राचार्य यांची नियुक्ती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व जिल्हा नियंत्रक यांच्यामार्फत करण्याचे निश्चित करण्यात आले.
- पोलीस बंदोबस्त व सुरक्षा: परीक्षेसाठी आवश्यक तो चोख व विनामूल्य पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्यात आले. तसेच, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः संबंधित परीक्षा केंद्रांना भेटी देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यावर चर्चा झाली.
- गोपनीय साहित्य: परीक्षेचे गोपनीय साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी व त्याच्या वितरणासाठी शासकीय कोषागाराची (Treasury) व्यवस्था करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
- मनुष्यबळ: परीक्षेच्या कामकाजासाठी जिल्ह्यातील आवश्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले.
- मार्गदर्शक सूचना: मा. शिक्षण आयुक्त यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांबाबत व जिल्हा स्तरावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने सदर परीक्षेच्या यशस्वी व सुरळीत आयोजनासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.








