काशीपीठाची परीक्षा ही जीवन परीक्षा : डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी

0
13

श्री काशीपीठाच्या परीक्षा प्रमाणपत्रांचे वितरण

सोलापूर : जीवनात आपण अनेक परीक्षा देत असतो. काही परीक्षा आपला चरितार्थ चालवण्यासाठी नोकरी, उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी देत असतो. तर काशीपीठाची परीक्षा ही जीवन परीक्षा आहे. जीवन कसे जगावे आणि कसे यशस्वी करावे यासाठी ही परीक्षा आहे असे प्रतिपादन काशीपीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

श्रीकाशी जगद्गुरू विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठ जंगमवाडी मठ वाराणसीच्या वतीने घेण्यात आलेल्या वीरशैव सिद्धांत परीक्षा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, श्री धानम्मादेवी ट्रस्ट गुड्डापूरचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, वीरशैव साहित्याचे अभ्यासक डॉ. अनिल सर्जे उपस्थित होते.
यावेळी सोलापूर शहरातील प्रबोध परीक्षेचे 71, प्रविण परीक्षेचे 17 आणि पंडित परीक्षेच्या 17 उत्तीर्ण परीक्षार्थींना महास्वामीजींच्या हस्ते प्रमाणपत्र व रुद्राक्ष वितरित करण्यात आले. यावेळी डॉ. इरेश स्वामी म्हणाले की, श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीसिद्धांत शिखामणी या ग्रंथाच्या माध्यमातून वीरशैव तत्वज्ञानाची प्रचार व प्रसार करत आहेत. तसेच या परीक्षांच्या माध्यमातून ते तत्वज्ञान प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवत आहेत. कार्यक्रमास बृहन्मठ होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे, विश्वनाथ आमणे उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राजशेखर बुरकुले यांनी केले. प्रास्ताविक परीक्षा विभागप्रमुख राजेंद्र बलसुरे यांनी केले. सूत्रसंचालन काशिनाथ आकाशे यांनी तर आभार प्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षा विभाग सहाय्यक गुरूशांत रामपुरे, प्राचार्य विद्यानंद स्वामी, सचिन विभुते, संतोष बिराजदार, केंद्र संचालक संदीप स्वामी, सुभद्रा संकद, अन्नपूर्णा हत्तुरे यांनी परिश्रम घेतले. फोटो ओळी : श्री काशीपीठाच्या वीरशैव सिद्धांत परीक्षा प्रमाणपत्र वितरणप्रसंगी श्री काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी, डॉ. इरेश स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, डॉ. अनिल सर्जे, राजेंद्र बलसुरे, गुरुशांत रामपुरे