सोलापूर – ( प्रतिनिधी ) – देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस शनिवारी सोलापुरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला . मात्र काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आपल्या यशदा युवती फाउंडेशनच्यावतीने सात रस्ता येथील कारीगर पेट्रोल पंपावर “सुशीलकुमार” किंवा “सुशील” नाव असलेल्या व्यक्तींना ५०१ रुपयांचे पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम राबवून लाखो लोकांची मने जिंकली.तर याच मोफत पेट्रोल वाटपाच्या उपक्रमाच्या माध्यमातून नगरसेविका पटेल यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदींना चपराक दिली.
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविण्यात आला.सकाळपासूनच पंपावर सुशीलकुमार आणि सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींच्या वाहनासह रांगा लागल्या होत्या.यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी ओळखीसाठी येताना सोबत आपले आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले होते.त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात येत होते .
काँग्रेसचे ज्येष्ट नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले,गटनेते चेतन नरोटे ,नगरसेवक रियाज हुंडेकरी आणि नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी डोणगाव रोड येथे राहणारे सुशीलकुमार माणिकराव शिंदे या व्यक्तीचा फेटा बांधून व पेढे भरवून तसेच त्यांच्या वाहनात पेट्रोल भरून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली .नगरसेविका पटेल यांच्या या भन्नाट उपक्रमाने अनेकांच्या डोळ्यात अंजन घातले तर नेत्याच्या गौरवाची आगळीवेगळी उपक्रमशिलता अनेकांच्या मनात घर करून राहीली.
माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले,गटनेते चेतन नरोटे यांनी नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.न भूतो न भविष्यती असा हा उपक्रम घेऊन नगरसेविका पटेल यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याप्रती आदराची , प्रेमाची व निष्ठेची भावना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस नेते सुधीर खरटमल ,शौकत पठाण,सोहेल पठाण,मनीषा उडानशिव,आशा सदाफुले,अमीर कुरेशी,जाकीर मणियार,रियाज ह-तुरे,रजिया जमादार,उषा कसबे, हमीदा पठाण,मुन्ना वळसंगकर आदी उपस्थित होते.
नेत्यांचा गौरव आणि मोदींच्या धोरणाचा निषेध
देशात आज दिवसेंदिवस पेट्रोलचे दर कमालीचे वाढू लागले आहेत.सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.पेट्रोल महाग झाल्यामुळे अनेकांनी आता आपल्या सायकली बाहेर काढल्या आहेत.इंधनाचे दर वाढत चालले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मात्र सामान्य माणसाचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही.नेत्याचा गौरव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढत्या इंधन दरवाढीच्या धोरणाचा निषेध यानिमित्ताने नोंदविण्यात आला. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम म्हणून मोफत पेट्रोल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सांगितले.