राज्यपालांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या : शरद पवार

0
14

मुंबई : राज्यपाल या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणं गरजेचं असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी याची दखल घ्यायला हवी असेही पवार यांनी म्हटले.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक असून नवीन काळात गडकरी हे नायक असल्याचे म्हटले होते. राज्यपालांच्या वक्तव्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी राज्यपालांवर टीका करताना केंद्र सरकारने त्यांना माघारी बोलावावे अशी मागणी केली आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, आतापर्यंत राज्यपालांनी विविध वक्तव्ये केली होती. एक मर्यादा म्हणून त्यावर भाष्य केले नव्हते. आता, मात्र राज्यपालांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी अशी मागणी शरद पवार यांनी केली. सीमावादाच्या प्रश्नावर भाजपला आपली जबाबदारी टाळता येणार नसल्याचेही पवार यांनी म्हटले. राज्यात शेतकरी अस्वस्थ आहे अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचं आहे.