जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास करून भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन कटिबद्ध -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

0
15

सोलापूर :- जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व आहे. याच अनुषंगाने शासनाने 73 कोटी 80 लाख रुपयांचा पंढरपूर मंदिर विकास आराखडा तर 368 कोटी रुपयांच्या अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समितीने मान्यता दिलेली आहे. त्याप्रमाणेच श्री क्षेत्र हत्तरसंग-कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी 173 कोटी 26 लाखाच्या आराखडयाला शासनाची लवकरच मान्यता मिळेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांचा विकास करून भाविकांना या ठिकाणी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाचे ध्वजारोहण वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शितल उगले-तेली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, प्रतिनिधी-पदाधिकारी नागरिक, विद्यार्थी, पालक व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले की, जिल्ह्यात माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानी पोटी सुमारे 1 लाख 23 हजार बाधित शेतकऱ्यांना 191 कोटी 73 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले होते, त्यापैकी 1 लाख 20 हजार शेतकऱ्यांना 160 कोटीचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच मार्च व एप्रिल 2023 या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे क्षेत्रिय स्तरावरून पंचनामे करून 4 हजार 55 बाधित शेतकऱ्यांसाठी 4 कोटी 50 लाख अनुदानाची मागणी शासनाकडे केलेली होती, त्यातील 3 कोटी 92 लक्ष अनुदान प्राप्त झालेले असून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाला निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीला संरक्षण देण्यासाठी फक्त एका रुपयात प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे संरक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला. सोलापूर जिल्ह्यातील 6 लाख 76 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. राज्यात कृषीसाठी विजेचा वापर करणाऱ्या पहिल्या तीन जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. शेतकऱ्यांच्या शेती पंपाला सुरळीत वीज पुरवठा होऊन त्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झालेले आहे. केंद्रशासनाच्या भारतमाला परियोजना अंतर्गत सुरत-चेन्नई या प्रकल्पाची सोलापूर जिल्ह्यात 153.33 किलोमीटर ची लांबी असून 1 हजार 180 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत 8, सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 4 व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत 5 अशा एकूण 17 रस्त्यांच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले असून 57 हजार खातेदारांना 3 हजार 800 कोटी रुपये भरपाई रक्कम देण्यात आलेली आहे. या सर्व महामार्गाच्या जाळ्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

सोलापूर शहरात आर्थिक दुर्बल घटकातील असंघटित कामगारांसाठी रे-नगर येथे 30 हजार सदनिकांचा गृहप्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. या गृहप्रकल्पात पहिल्या टप्प्यात 10 हजार सदनिकांचे काम पूर्ण झालेले असून, त्याचे लोकार्पण लवकरच माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या हस्ते करण्याचे नियोजित आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फायर सेफ्टी करता अत्यंत उपयुक्त असलेली फायर बॉल यंत्रणा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बसवण्यात आलेली आहे. या यंत्रणेमुळे रुग्णालयाची फायर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम झाली असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील 7 हजार 543 उद्योजकांना 418 कोटी 28 लाख रुपये कर्ज वाटप झालेले असून, त्यांना या योजनेअंतर्गत 43 कोटी 47 लाख रुपये व्याज परतावा देण्यात आलेला आहे. रमाई आवास योजना अंतर्गत सन 2023-24 या वर्षात नागरी भागातील एकूण 903 घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना असून सन 2016-17 ते सन 2022-23 पर्यंत 70 हजार घरकुले देण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 49 हजार 848 घरकुले पूर्ण झालेले आहेत तर 16 हजार 159 घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. या पद्धतीने जिल्ह्यातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची माहिती श्री मुश्रीफ यांनी दिली.

सोलापूर महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत विविध पायाभूत विकासाची कामे सुरू आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत 2024 अखेरपर्यंत ‘हर नल से जल’ हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गतिमान पद्धतीने काम सुरू आहे. राज्य शासन एक महत्त्वकांक्षी उपक्रम म्हणून ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवत आहे. एका छताखाली सर्व शासकीय योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला 75 हजार लाभार्थ्यांना एकाच दिवशी लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे घेण्याचे नियोजित असून जिल्हा प्रशासन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व सांगून या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानीने दिलेल्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. देशभक्त मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात महानायकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याप्रती वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी कृतज्ञता व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वर्धापन दिन निमित्त ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताकाचा 76 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. या कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवरांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी मंत्री महोदयांनी सर्व उपस्थित नागरिकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याबाबतची शपथ दिली.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागनाथ चंद्रकांत फुटाणे यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस मेडल आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी मधील राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. महसूल विभागाच्या गट क संवर्गाच्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना मंत्री महोदयांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय करमाळा व देवडीकर मेडिकल सेंटर अकलूज यांचा गौरव ही मुश्रीफ यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.