सोलापूर शहरातून एक धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे.सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात तब्बल ६२ लाख रुपयांच्या सोन्याच्या अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रिजवान रियाज हुंडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकबर मन्सूर शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा ज्वेलर्स दुकानात नोकर म्हणून काम करत होता. दागिने तयार करण्यासाठी दिलेले २४ कॅरेट सोन्याचे कच्चे मटेरियल आरोपीने अपहार केल्याचा आरोप आहे.सोन्याऐवजी तांबे आणि पितळ मिश्र धातू तयार करून तेच सोने असल्याचे भासवून फिर्यादीची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणात सुमारे ६२० ग्रॅम म्हणजेच अंदाजे ६२ लाख रुपयांचे सोने लंपास करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.ही घटना जून २०२४ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे समोर आले असून १२ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


