गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम; सोनिया गांधींना पाठवले पत्र

0
80

येस न्युज नेटवर्क : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असलेले गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, त्यांनी काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. राजीनामा देत गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानी पत्रही लिहिले. गुलाम नबी आझाद यांनी लिहिले की, अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचा माझा अर्धशतकाहून अधिक जुना संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गुलाब नबी आझाद हे काँग्रेसमधील एका मोठा चेहरा मानले जातात. ते यापूर्वी राज्यसभेत विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे आता पक्षातील अनेकांना धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नियुक्त्यांमध्ये त्यांचा सल्ला महत्त्वाचा मानला जायचा. अलीकडेच नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी बोवलावे होते. यावेळी काँग्रेसने केलेल्या देशव्यापी आंदोलनात आझाद सहभागी झाले होते. याशिवाय पत्रकार परिषद देखील घेतली होती. मात्र गेल्या काही काळापासून आझाद काँग्रेसवर नाराज होते. काँग्रेसच्या नाराज G 23 गटात त्यांचा सक्रिय सहभाग होता. या गटाकडून सातत्याने पक्षात अनेक बदल करण्याची मागणी केली जात आहे.