सोलापूर शहरात सध्या वाढलेल्या वाहतूक कोंडी मध्ये आणखी भर पडणार आहे. 103 वर्ष जुना असलेला दमानी नगरचा रेल्वे ब्रीज 14 डिसेंबर रोजी पाडला जाणार आहे . याबाबत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी आदेश देखील काढले आहे . 14 डिसेंबर रोजी आधुनिक हायड्रोलिक ब्रेक, काँक्रीट क्रशर आणि कटिंग मशीन च्या साह्याने हा ब्रिज पाडला जाणार आहे त्यासाठी रेल्वे कडून देखील मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्रिज उभारण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे . त्यामुळे वर्षभर तरी या पुलावरून त्वरित शहरात ये-जा करणाऱ्या लोकांना मोठा वळसा घालून यावे लागणार आहे . मंगळवार ९ डिसेंबरपासून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरवासीयांना पर्यायी मार्गावरून यावे असे आवाहन केले असले, तरीही तीन असलेले पर्यायी मार्ग अपुरे – अरुंद- आणि अतिक्रमण युक्त आहेत. बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या 54 मीटर रस्त्यावरील रेल्वे अंडर ब्रिजच्या खालील अप्रोच रोडचे काम महापालिकेकडून गतीने सुरू आहे त्यामुळे इथून वाहतूक सुरू होणार आहे. हाच मार्ग सध्या प्रशस्त असून बाकीच्या मार्गावर अतिक्रमणे आहेत. मरीआई चौक- नागोबा मंदिर- रामवाडी पोलीस चौकी, मोदी बोगदा हा मार्ग तसेच मरीआई चौक- शेटे नगर -रेल्वे बोगदा -खमितकर अपार्टमेंट -निराळे वस्ती मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मार्ग अत्यंत अरुंद आणि अतिक्रमण युक्त आहे. याकडे महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा शहरात खूप मोठी वाहतूक कोंडी निर्माण होईल.

