आरोग्य संवाद कार्यक्रमात डॉक्टरांच्या समस्यांवर चर्चा; विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद, लवकरच कार्यवाहीचे आश्वासन
सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य संवाद कार्यक्रमादरम्यान सोलापूर जिल्ह्यातील आयएमए, निमा तसेच विविध वैद्यकीय संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी डॉक्टरांच्या समस्या, प्रशासकीय अडचणी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.
डॉक्टरांना सन्मानपूर्वक वागणूक मिळावी – आयएमएची मागणी
आयएमएच्या वतीने डॉ. संजय मंठाळकर यांनी प्रशासनाकडून डॉक्टरांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली. हॉस्पिटल इन्स्पेक्शनदरम्यान डॉक्टरांना चोरांप्रमाणे वागणूक दिली जात असल्याची तक्रार त्यांनी मांडली. यावर आरोग्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना डॉक्टरांशी सौजन्याने वागण्याचे निर्देश दिले.
बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना समान वेतनाची मागणी
निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनायक टेम्बुर्णीकर यांनी बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या मांडल्या. राज्यातील वैद्यकीय अधिकारी भरतीमध्ये एमबीबीएससोबत २५ टक्के जागा बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवाव्यात. तसेच समान काम, समान वेतन या तत्त्वानुसार बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना एमबीबीएस अधिकाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, अशी मागणी केली.
ग्रामीण भागातील डॉक्टरांसाठी डे केअर सेंटरची स्वतंत्र नियमावली
डे केअर सेंटरच्या नोंदणीसाठी सध्याच्या बॉम्बे नर्सिंग अॅक्टपेक्षा स्वतंत्र आणि सुटसुटीत नियमावली तयार करावी, अशी मागणीही निमा संघटनेने केली. यामुळे ग्रामीण भागातील डॉक्टरांना डे केअर सेंटर सुरू करण्याची संधी मिळेल. कमी जोखमीच्या रुग्णांना ग्रामीण भागातच माफक दरात दर्जेदार उपचार मिळतील आणि शहरांमधील आरोग्य व्यवस्थेवरील रुग्णांचा ताण कमी होईल. या मागणीला आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ग्रामीण भागात बायोमेडिकल वेस्ट सेवा मिळत नसल्याबद्दल मंगळवेढा येथील हॉस्पिटल संघटनेने तक्रार दिली. यावर आरोग्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन एस एस इन्फ्रा या बायोवेस्ट कंपनीज तत्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे त्याचप्रमाणे बायोमेडिकल वेस्ट प्लांट हे स्थानिक वैद्यकीय संघटना यांना चालवायला देण्याबद्दल शासन विचाराधीन असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील प्रलंबित बिलांचा प्रश्न
खासगी रुग्णालयांच्या वतीने डॉ. चिडगुपकर यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील बिलांचे पेमेंट उशिरा होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला.पॉलीट्रॉमा रुग्णांच्या उपचारांमध्ये एकापेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या जातात. प्रत्येक वेळी नवीन मंजुरी घ्यावी लागते विविध कारणांमुळे क्लेम रिजेक्ट केले जात असल्याने रुग्णालयांची देयके अडकत असल्याचे त्यांनी सांगितले. ई-इन्स्पेक्शन प्रक्रियेत नाकारण्यात आलेल्या बिलांची वरिष्ठ स्तरावर पुनर्तपासणी करून ती मंजूर करावीत, अशी मागणी करण्यात आली.
बार्शीतील कर्करुग्णांसाठी पेट स्कॅन सुविधेची मागणी
बार्शी येथे उभारण्यात आलेल्या पेट स्कॅन मशीनचा लाभ महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कर्करुग्णांना मिळावा, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात शासन निर्णय (GR) झालेला असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नसल्याने रुग्णांना पेट स्कॅन सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. याबाबत लवकरच निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य संवाद कार्यक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या विविध समस्या थेट आरोग्यमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली. डॉक्टरांच्या मागण्यांवर आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने वैद्यकीय क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.











