७६ ग्रामपंचायतींमध्ये विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन..वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी व बाईक रॅलीद्वारे जनजागृती
सोलापूर- सेवा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाचा संदेश देणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानाचा’ सांगोला तालुक्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींमध्ये अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंचायत समिती, सांगोला येथे सभापती पूनम सुदर्शन इंगवले यांच्या हस्ते पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सांगोला शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये ‘सेवा संकल्प अभियानाबाबत’ जनजागृती करण्यात आली.
तसेच, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कांबळे यांनी ग्रामपंचायत शिवणे येथे वृक्षारोपण करून अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांना अभियानाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अभियानाची सप्ताहनिहाय प्रभावी अंमलबजावणी करण्यासह प्रत्येक उपक्रमात लोकसहभाग वाढविण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये वृक्षारोपण, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, जनजागृतीपर कार्यक्रम यांसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये ग्रामस्थ, महिला, युवक, विद्यार्थी, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
‘सेवा हीच सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून, स्वच्छ व सुंदर गावांची निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.सांगोला तालुक्यातील सर्व ७६ ग्रामपंचायतींमध्ये अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून लोकसहभागातून विकास आणि सामाजिक परिवर्तनाचा संकल्प करण्यात आला आहे.











