सोलापूर : व्यंग, मिश्कीलपणा, चित्रमयता आणि मार्मिकता यांचा सुरेख मिलाफ असलेल्या शिरीष कणेकरांच्या लेखनाची स्वतंत्र शैली पुढे ‘कणेकरी शैली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, दादा कोंडके, आशा भोसले, अमीन सायानी अशा अनेक दिग्गजांशी असलेला त्यांचा निरपेक्ष स्नेह त्यांच्या लेखनातून जिवंतपणे व्यक्त झाला.

याच लेखनाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेत संजय मोने, प्रसाद फणसे, विजय केंकरे आणि उदय सबनीस यांनी कणेकरांच्या विविध लेखांचे दमदार अभिवाचन सादर केले.शिरीष कणेकर यांच्या लेखणीइतकाच त्यांच्या बोलण्यातलाही मिश्कीलपणा वैशिष्ट्यपूर्ण होता. हजरजबाबीपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. बोलता बोलता समोरच्या व्यक्तीला अचंबित करणारे किंवा निरुत्तर करणारे चपखल वाक्य सहजपणे त्यांच्या तोंडून बाहेर पडत असे. माणसांत रमणारे, मैत्रीला जागणारे आणि जगण्यातली वैगुण्ये टिपतानाही जीवनावर अफाट प्रेम करणारे कणेकर यांचे व्यक्तिमत्त्व अनेक पैलूंनी समृद्ध होते.कणेकरांच्या अशाच विविध पैलूंना उजाळा देणारे अनेक किस्से संजय मोने, विजय केंकरे, उदय सबनीस आणि प्रसाद फणसे यांनी सांगितले. त्यांच्या आठवणींमधून कणेकरांचा मिश्कील स्वभाव, मैत्रीची ऊब, माणसांकडे पाहण्याची त्यांची वेगळी दृष्टी आणि जीवनाकडे पाहण्याचा दिलखुलास दृष्टिकोन रसिकांसमोर उलगडत गेला.

यानंतर चौघांनीही कणेकरांच्या विविध लेखांचे आपल्या दमदार आवाजात आणि अभिनयाच्या विविध छटांसह अभिवाचन केले. आवाजातील चढ-उतार, शब्दांवरचा नेमका भर आणि प्रसंगानुरूप अभिनय यामुळे हे अभिवाचन केवळ वाचन न राहता वाचिक अभिनयाचा प्रभावी आविष्कार ठरले. कणेकरांच्या लेखनातील विनोद, मिश्कीलपणा, मार्मिकता आणि संवेदनशीलता रसिकांपर्यंत तितक्याच प्रभावीपणे पोहोचली. प्रत्येक लेखाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते सर्व कलाकारांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभागृहातील सर्व आसने भरल्यानंतरही अनेक रसिकांनी उभे राहून या अनोख्या साहित्यिक मैफलीचा आनंद घेतला. कार्क्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधव देशपांडे यांनी केले.










