सोलापूर – सोनं घेऊन देतो, मोठा फायदा करून देतो असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल ५० लाख ९६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन सुरेश अपराज, वय ३२, रा. वेले नगर, शेटेवस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर फसवणूक सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी घडली आहे.

या प्रकरणी राकेश अण्णा, रा. काकीनाडा, आंध्र प्रदेश दिपक घुटे, रा. रुईडोकी, जिल्हा धाराशिव आणि आनंद निवाळकर, रा. धाराशिव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी फिर्यादी सचिन अपराज व त्यांचा मित्र किशोर घोंगडे यांना सोनं देतो, मोठा नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. विश्वास बसावा म्हणून त्यांनी सोन्याचे कॉइन, बिस्किटे दाखवली. तसेच पैशांच्या बदल्यात नकली नोटा व खोट्या सह्यांचे चेक दिले.यानंतर पैशांची मागणी करून मोठी रक्कम घेतली. नंतर पैसे बुडतील अशी भीती निर्माण करून फिर्यादी व त्यांच्या मित्राची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

