अन्न प्रक्रिया योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे! कृषि प्रक्रीया जागृती पंधरवडा 1 ते 15 ऑगस्ट

0
31

सोलापूर दि. 07 (जि.मा.का.) :-   केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून नविन व कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगाच्या विस्तारीकरण व अद्ययावतीकरणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. जिल्ह्यातील  जास्तीत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी  सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

सदर योजनेचे दिनांक ०१ ते १५ ऑगष्ट २०२३ या कालावधीत  कृषि प्रक्रीया जागृती पंधरवडा साजरा करण्यात येत असून, प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यशाळा आयोजित करुन प्रचार व प्रसिध्दी करुन लाभार्थ्याचे अर्ज मागणी केली जाणार आहे. योजनेसाठी वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत पीठ, पापड, बिस्कीटे, माल्ट, फ्लेक्स, कुकीज, आईसक्रीम, चिप्स, बासुंदी, दुध पावडर, खवा, बेदाणा प्रक्रीया, नमकीन, फुटाणे, पोहा, पल्प, जाम, जेली, गुळ पावडर इत्यादी पात्र प्रकल्प किमतीच्या ३५ टक्क्यापर्यंत व जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान देण्यात येईल. यासाठी पात्र उमेदवाराचे वय १८ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना लाभ सामाईक पायाभूत सुविधा मधून देण्यात येतो त्यासाठी शेतकरी उत्पादक संख्या एफ.पी.ओ,  शेतकरी उत्पादक कंपनी एफपीसी, सरकारी संस्था, स्वयंसहायता गट एसएचजी तसेच शासकीय संस्था यांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के व जास्तीत जास्त ३.०० कोटी अनुदान देय आहे.
 या योजनेचे अर्ज अत्रप्रक्रीया विभागाच्या http://pmfme.mofpi.gov.in  किंवा http://omfine.mofp.gov.in/mis/#/login या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहेत. तसेच सदर प्रकल्पासाठी अर्ज नोंदणी करण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तीची नेमणुक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडुन सदर अर्ज विनाशुल्क नोंदणी करून घ्यावे व योजनेचा लाभासाठी  जिल्हयातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी ३१ ऑगष्ट पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहनही  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.