उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, शनिवार (1 ऑगस्ट) सायंकाळी 7 वाजल्यापासून भीमा नदीत 90 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. परिस्थितीनुसार या विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यामुळे भीमा नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात कोणीही उतरू नये तसेच नदीपात्रात असलेले जनावरे, शेतीसाहित्य व इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सखल भागातील नागरिकांना त्वरित सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
ही माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु. उ. डुंबरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.










