संगमेश्वर कॉलेज द्वितीय, के. बी. पी. महाविद्यालय पंढरपूर तृतीय
बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२व्या युवा महोत्सवात बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाने आपल्या सांस्कृतिक व कलात्मक वर्चस्वाची परंपरा कायम राखत ११५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपदाचा मान पटकावला. सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजने ८९ गुणांसह द्वितीय, तर पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने ६० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. विशेष म्हणजे, शिवाजी महाविद्यालयाने आतापर्यंत तब्बल १७ वेळा युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे.
बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात विद्यापीठाचा यंदाचा २२वा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. विविध कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत रसिकांची दाद मिळवली. गुरुवारी झालेल्या दिमाखदार समारोप व पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या महाविद्यालयांची घोषणा करण्यात आली. प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर होते. यावेळी आमदार दिलीप सोपल, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव प्रकाश पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. प्रभाकर कोळेकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विविध विभागांतील विजेत्यांची घोषणा व पारितोषिकांचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.
युवा महोत्सवातील विभागनिहाय कामगिरीत ललित विभागाचे विजेतेपद संगमेश्वर कॉलेजने, तर नाट्य विभागाचे विजेतेपद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिविभागाने पटकावले. संगीत, लोककला आणि नृत्य विभागात श्री शिवाजी महाविद्यालयाने विजेतेपद मिळवत सर्वसाधारण विजेतेपदावरही आपली मोहोर उमटवली.
ऐश्वर्या लोंढाळकर ‘गोल्डन गर्ल’; पार्थ फुरडे ‘गोल्डन बॉय’
युवा महोत्सवात विविध कला प्रकारांमध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीला ‘गोल्डन गर्ल’, तर विद्यार्थ्याला ‘गोल्डन बॉय’ हा किताब प्रदान केला जातो. यंदाचा ‘गोल्डन गर्ल’ किताब कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या लोंढाळकर हिने पटकावला. तर श्री शिवाजी महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ फुरडे याची ‘गोल्डन बॉय’ म्हणून निवड झाली. मागील वर्षीचे विजेते स्नेहल विधाते, सई दरेकर आणि प्रेम सरोदे यांच्या हस्ते या मानाच्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.


प्रचंड मेहनत करा, यश मिळवा आणि उत्तम माणूस बना: श्रेया बुगडे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि श्री शिवाजी महाविद्यालयाने उत्कृष्ट युवा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा मिळण्याबरोबरच त्यांच्यात नवी ऊर्जा निर्माण होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. कष्टाला पर्याय नाही. प्रचंड मेहनत करून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सातत्याने वाटचाल करावी, तसेच आई-वडिलांचा सन्मान होईल अशा पद्धतीने वागावे. उत्तम माणूस बनण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले.
ज्या क्षेत्रात काम कराल, त्यात पूर्ण समर्पणाने झोकून द्या: डॉ. प्रकाश महानवर
यावेळी बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून सातत्याने चांगले कलाकार घडत आहेत. आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रात पूर्णपणे झोकून देऊन काम केल्यास यशाबरोबरच आपले नावही उज्ज्वल होते. आई-वडील आणि शिक्षकांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्नशील राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.














