वालचंद महाविदयालय समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांची आगळी वेगळी दिवाळी ……
सोलापूर दिनांक – सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास विभाग, हे बालक जीवन, सुरक्षा, विकास सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बाल संरक्षण आणि पुनर्वसन सेवेंतर्गत विभागाने राज्यात बाल संगोपन संस्थांची एक साखळी निर्माण केली आहे. ज्यामध्ये बालगृह, संगोपन केंद्र आणि निरीक्षण गृह आणि विशेष गृह इत्यादी सेवा आहेत. सीसीआय मध्ये राहणाऱ्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज सामील व्हावेत तसेच त्यांचे पुनर्वसन यशस्वी व्हावे यासाठी विभाग कार्यरत असतो. याच अनषंगाने सोलापुरात आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून बालगृह चालते.
या बालगृहात वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित आणि अपराधी बालकांची काळजी घेणे आणि त्यांना संरक्षण देणे.अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे, निराधार, अनाथ आणि दुर्लक्षित बालकांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे,बालकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे बालविवाहांना प्रतिबंध करणे आणि बालक तस्करीला प्रतिबंध करणे,बाल हक्क आणि न्यायाविषयी समाजात जाणीव जागृती करणे हे कार्य केले जाते. अशा बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र,समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आगळी वेगळी दिवाळी साजरी केली. अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ विजया महाजन यांनी दिले.
वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र समाजकार्य विभाग, सोलापूर जिल्हा महिला व बालविकास विभाग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी ठाकूर यांच्या आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या बालगृहातील विद्यार्थ्यांना सुगंधी अत्तर, दिवाळी फराळ,कोरडी शिधा आणि बहुविध वाचनीय पुस्तके भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ.विजया महाजन, जिल्हा परीविक्षा अधिकारी वैशाली भोसले, ॲड अनिल वासम, ॲड.प्रशांत कांबळे, ॲड.पवन रणसुभे,ॲड. आशा वाघमारे ॲड.शिवकन्या गणेचारी,आदर्श भरमा, अभिजित राठोड आदींची उपस्थिती होती.