सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात चंद्रयान ३! लँडिंगचे थेट प्रक्षेपण…

0
27

भारताच्या ‘चंद्रयान-३’ ने बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँड केले. चंद्रयान-३ चे लँडिंग हा एक अविस्मरणीय क्षण असल्याने याचे थेट प्रक्षेपण जगभरामध्ये दाखविण्यात आले. सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या मनात नाविन्याची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या संशोधन वृत्तीस वाव मिळावा, खगोलशास्त्राची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावे यासाठी महाविद्यालयात चंद्रयान ३ चे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एकत्रितपणे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


“चंद्रयान ३” भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो) तिसरी चंद्र मोहीम होती. २२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान २ मोहीम अंतिम टप्प्यात यानाचा संपर्क खंडित झाल्यामुळे अंशतः अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर इस्त्रोने चंद्रयान ३ मोहीम हाती घेत १४ जुलै २०२३ रोजी चंद्रयान ३ प्रक्षेपित केले. १४ जुलैला सुरू झालेली ही मोहीम आज निर्णायक टप्प्यावर असल्याने जगभरातील सर्वच वैज्ञानिकांचे लक्ष या मोहिमेवर होते. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातील पहिला देश ठरला आहे. “एक भारतीय म्हणून या क्षणाचा मला अत्यंत अभिमान आहे” या शब्दात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याशिवाय चंद्रयान ३ मोहिमे संदर्भात विविध वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगत विद्यार्थिनींच्या प्रश्नांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तरे देत विद्यार्थिनींच्या शंकेचे समाधान केले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष प्रा. शीला मिस्त्री, सचिव प्रा. वीणा पतकी, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे, महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी, विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.