चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर सोलापूर विद्यापीठात जल्लोष!

0
23

इस्रो व भारतीय शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

सोलापूर, दि. २३- चांद्रयान -३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी इस्रो आणि भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या सभागृहात चंद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर विद्यार्थी, शिक्षक व अधिकाऱ्यांनी पाहिले. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठात प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे म्हणाले, इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या मेहनतीला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे. यामुळे समस्त भारतीयांचे मान उंचावले आहे. चंद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगमुळे चंद्रावरील विविध घटकांचा अभ्यास करता येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
भारत महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे पाऊल
भारतासाठी आज खूप महत्त्वाचा दिवस होता. संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या चंद्रयानाकडे होते. आपले यान चंद्रावर यशस्वीपणे उतरले. याचे सर्व श्रेय शास्त्रज्ञ तसेच भारत सरकारला जाते. आता यापुढे चंद्रावरील विविध गोष्टींचा अभ्यास होईल. भारत महासत्ता होणाच्या दृष्टिकोनातून आजचे चंद्रावरील यानाचे पाऊल अतिशय महत्त्वाचे आहे, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी सांगितले.