परळी : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यानाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कामगारांची भविष्य निधीची रक्कम जमा न केल्याने, या कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढच नाहीतर त्यातून ९२ लाख रुपये जप्त देखील करण्यात आलेले आहेत.
वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती. मात्र तरीही रक्कम न भरण्यात आल्याने कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आले आहे व त्यातून रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. अशी माहिती औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आय़ुक्त जगदीश तांबे यांनी दिली आहे.कारखान्याने मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी थकीत रक्कम 1 कोटी 46 लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस आर वानखेडे यांनी वसुली नोंदवली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.









