भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेची प्रकृती गंभीर, नराधमांना 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

0
26

भंडारा : भंडाऱ्यात महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना घटनास्थळी नेऊन पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी या दोघांना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणी पीडितेची प्रकृती गंभीर असून सध्या पीडित महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भंडारा जिल्ह्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत कनहाडमोह गावाजवळ झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडीतेची अवस्था गंभीर आहे. रक्तस्त्राव थांबवण्यासाठी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून आणखी शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याची माहिती आहे. 30 जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती.