येस न्युज नेटवर्क : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात नियमित जामीनासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळून लावला. तीन प्रमुख मुद्दयांवर न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावाला. प्रथमदर्शनी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहेत. त्यावरून अनिल देशमुख यांनी मनी लाॅंड्रिंग केल्याचं स्पष्ट दिसत आहे.
29 डिसेंबर 2021 रोजी ईडीने देशमुखांविरोधात पुरवणी आरोपपत्र आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्या (पीएमएलए)अंतर्गत विशेष न्यायालयात दाखल केले. सुमारे सात हजार पानांचे आरोपपत्र असून या प्रकरणातील हे दुसरे आरोपपत्र आहे. आरोपपत्रानुसार देशमुख या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. देशमुखांचा डिफॉल्ट जामीन अर्ज न्यायालयाने 17 जानेवारी रोजी फेटाळून लावल्यानंतर आता देशमुखांनी पीएमएलए न्यायालयात नियमित जामीन अर्ज केला आहे. ईडीच्यावतीनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करताना ईडीनं देशमुखांच्या जामीनाला विरोध दर्शविला होता.
