सोलापूर जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निधीतून आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना मोफत वाटण्यासाठी 50 लाख रुपयांचे चष्मे खरेदी करण्यात आले. ही खरेदी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांना अंधारात ठेवून केली. याबाबत प्रसिद्धी माध्यमातून आवाज उठवल्यानंतर जैन यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांच्यासह तिघांची चौकशी समिती नेमली. मात्र गेल्या अडीच महिन्यापासून कोपूरवाड यांना या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही. एवढे दिवस वर्षा डोईफोडे यांचा खुलासा आला नाही असे कारण सांगत चौकशी रखडली. डोईफोडे यांनी आपले म्हणणे देऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरीही डॉक्टर कोपुरवाड यांनी चौकशी अहवाल झेडपी सीईओ यांच्याकडे सादर केला नाही. यातून डोईफोडे यांना वाचवण्याचा प्रयत्न जिल्हा आरोग्य अधिकारी करू लागले आहेत अशी शंका उपस्थित झाली आहे. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी असताना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी 24 जुलै रोजी 50 लाख रुपयांचे चष्मे खरेदी बाबतचा पुरवठा आदेश दिला. 50 लाखांची वर्क ऑर्डर झेडपी सीईओ यांच्यासहने देणे अपेक्षित असताना त्यांनी परस्पर पुरवठा आदेश दिला कसा, ज्या दिवशी पुरवठा आदेश दिला त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंढरपुरातील वारकरी बहुतांश परतले त्यामुळे हे चष्मे नक्की कोणाला वाटले, आणि पुरवठादाराची बिल अदा केले का या सर्व बाबी संशयाच्या भोवर्यात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कोपूरवाड हे जिल्हा शल्यचिकित्सक डोईफोडे यांना या प्रकरणातून वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे झेडपी सीईओ यांनी शासनाला पत्र पाठवून एन एच एम मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या गंभीर प्रकरणाची चौकशी केली तर सत्य बाहेर येईल. नाहीतर झेडपीच्या टोळीचा देखील या भ्रष्टाचाराला पाठिंबा आहे असेच दिसेल.











