ऐतिहासिक नगरपालिकेच्या इमारत सुशोभीकरणासंदर्भात नगर अभियंता कारंजे यांनी केली पाहणी

0
18

संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक त्या सूचना

सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पारतंत्र्यात तिरंगा ध्वज डौलाने फडकलेल्या नवी पेठेतील ऐतिहासिक नगरपालिकेच्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी इमारत परिसराची गुरुवारी पाहणी केली.

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखदार, शानदार साजरा करण्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासन जय्यत तयारी करीत आहे. सोलापूर महापालिका कौन्सिल हॉल व प्रशासकीय इमारतीचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर पारतंत्र्यात ज्या नगरपालिका इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवण्यात आला त्या नवी पेठ येथील ऐतिहासिक  इमारतीचीही रंगरंगोटी, सुशोभीकरण व इतर कामे करण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी बुधवारी सायंकाळी नगर अभियंता संदीप कारंजे यांना दिले होते. दरम्यान, नगर अभियंता संदीप कारंजे यांनी तातडीने गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवी पेठ येथील जुनी नगरपालिका इमारत( सध्याची महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ) परिसराची संपूर्ण पाहणी केली. 

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या ऐतिहासिक प्रेरणादायी इमारतीला रंगरंगोटी, स्वच्छता, सुशोभीकरण, विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. पारतंत्र्यात तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेल्या येथील ध्वजस्तंभाची नगर अभियंता कारंजे यांनी आवर्जून पाहणी केली.

      दरम्यान, नगर अभियंता कारंजे यांनी यावेळी झोन व इतर अधिकाऱ्यांना येथील परिसरातील स्वच्छता – साफसफाई व अन्य कामे करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उद्यान अधीक्षक रोहित माने यांनाही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या इमारतीच्या कंपाउंड मधील कोपऱ्यात बंद पडलेली दोन वाहने तत्काळ इतरत्र हलविण्यास सांगितले. तातडीने येथील सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे.