काँग्रेसने भाजपच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह पसरला असून याची दखल घेऊन भाजपच्या वतीने आज सोलापूर शहरात सायंकाळी पदयात्रा काढली जाणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली असताना ऐनवेळी चार पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पूनम गेट हा पदयात्रेचा मार्ग बदलून आता भाजपची ही काँग्रेस विरोधातील पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक- बाळीवेस – मधला मारुती कौतम चौक या मुख्य बाजारपेठेतून निघणार आहे. या पदयात्रेसाठी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. सुमारे 25 हजार कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होतील असा दावा भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी केला आहे. दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पदयात्रा संपल्यानंतर कौतम चौकात सभा होणार आहे. या पद यात्रेच्या मार्गावरून देखील भाजपमध्ये असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. खासदार प्रणिती शिंदे यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या या पद यात्रेची खिल्ली उडवली. त्यामुळे भाजप नेते याला काय उत्तर देतात याची उत्सुकता लागली आहे.










