सोलापूर महापालिकेची तब्बल दोन महिन्यानंतर ची सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता आयोजित केली आहे. या सभेत सोलापूर शहरातील अनेक महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाने निर्णयासाठी मनपा बोर्डासमोर पाठविले आहेत. सोलापूर शहरातील कुत्र्यांचे निर्जीबीकरण करणे, तसेच रेबीज लस खरेदी करण्याचा सुमारे 9 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेसमोर निर्णयासाठी पाठवला आहे. शहरातील मुली आणि महिलांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित विविध कोर्सेस महिला व बालकल्याण समितीमार्फत दिले जाणार असून त्याला निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चा प्रस्ताव बोर्डात आला आहे. सोलापूर शहरातील विविध शाळा दुरुस्तीचे एक कोटी 87 लाखांचे प्रकरण मनपा बोर्डासमोर आले आहे.
बऱ्याच दिवसापासून गाजत असलेले जुळे सोलापुरातील नाट्यगृह सुंदरम नगर आयटीआय जवळ बांधण्याबाबतचा प्रस्ताव या बोर्डात आहे. सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्याच्या दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट लावण्याचा प्रस्ताव देखील या सभेत मंजुरीसाठी आला आहे. शहरातील महापालिकेच्या आठ झोन साठी पाणी टँकर खरेदी करणे तसेच महापालिकेचे रिकामी गाळे भाडे तत्त्वावर देण्यासाठीचे प्रस्ताव प्रशासनाकडून बोर्डासमोर मंजुरीसाठी आले आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाचे विषय असलेले बोर्ड शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत.











