चारा टंचाई रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे साखर कारखान्यांना निर्देश; मजुरांमार्फतच ऊसतोडणी करण्याचे आदेश
सोलापूर : जिल्ह्यातील संभाव्य तीव्र चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनचा वापर टाळण्याचे निर्देश सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत. यापुढे ऊसतोडणी केवळ मजुरांमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जून ते सप्टेंबरदरम्यान अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हार्वेस्टरद्वारे ऊसतोडणी केल्यास उसाचे वाढे आणि पाचट जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध होत नाही. त्यामुळे मजुरांमार्फत ऊसतोडणी केल्यास मोठ्या प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध होऊन पशुधनाला दिलासा मिळणार आहे.
ऊसतोडणीदरम्यान उपलब्ध होणारा हिरवा चारा स्थानिक शेतकरी व पशुपालकांना तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.











