सेवा संकल्प अभियानांतर्गत ३५८ विद्यार्थ्यांचा सहभाग; स्वच्छतेचा संकल्प
सोलापूर : सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये दि. २ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी आश्रमशाळा व वसतिगृह अभियान’ राबविण्यात आले. या अभियानात एकूण ३५८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यालयाच्या अधिनस्त तीन शासकीय आश्रमशाळा, दोन अनुदानित आश्रमशाळा आणि सहा शासकीय वसतिगृहांमध्ये दि. २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. अभियानाच्या कालावधीत दररोज विविध स्वच्छताविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये आश्रमशाळा व वसतिगृह परिसर, वर्गखोल्या आणि शैक्षणिक परिसराची स्वच्छता, शौचालय व स्नानगृहांची स्वच्छता, पिण्याचे पाणी व जलस्रोतांची स्वच्छता, स्वयंपाकगृह व भोजनगृहाची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला. तसेच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व जलनिस्सारण, मुलींची स्वच्छता व मासिक पाळी व्यवस्थापन, हरित व सुंदर आश्रमशाळा, वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य, स्वच्छतेविषयी जनजागृती आणि विद्यार्थी सहभाग असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
याशिवाय अनावश्यक साहित्य, अभिलेख व साठा व्यवस्थापन तसेच आश्रमशाळा व वसतिगृहांची अंतिम स्वच्छता आणि तपासणी करण्यात आली. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी विकसित करणे, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दि. १७ ऑक्टोबर रोजी अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी स्वमूल्यांकन करण्यात आले, स्वच्छता समितीची बैठक आयोजित करण्यात आली आणि उर्वरित कामांची नोंद घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांकडून स्वच्छता राखण्याचा संकल्प करून घेण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आलेल्या या अभियानामुळे आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली











