दुहेरीत भारताच्या दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार यांना विजेतेपद
सोलापूर : सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(एसडीएलटीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना(एआयटीए), महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र शासन, सोलापूर महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालय पुरस्कृत एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 25हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग, अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार या भारतीय जोडीने विजेतेपद संपादन केले.
सोलापूर येथील एमएसएलटीए टेनिस कोर्ट, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात तिसऱ्या मानांकित भारताच्या करण सिंग याने थायलंडच्या थानापट चॅनताचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 19मिनिटे चालला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत सहाव्या मानांकित अमेरिकेच्या समीर बॅनर्जी याने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या स्वीडनच्या रेचटमन विन्सिगुएरा, डब्ल्यू याचा 3-6, 6-3, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 2तास 2 मिनिटे चालला.
दुहेरीत अंतिम फेरीत भारताच्या दक्षिणेश्वर सुरेश व मनीष सुरेशकुमार यांनी दुसऱ्या मानांकित भारताच्या आदिल कल्याणपूर व जपानच्या रियुकी मत्सुदा यांचा 6-3, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या जोडीला करंडक, १,७०,०००/-रुपये व २५आयटीएफ गुण, तर उपविजेत्या जोडीला करंडक, ९८,०००/-रुपये व १४आयटीएफ गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओएसिस मॉल चे व्यस्थापकीय संचालक सिद्धार्थ गांधी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पर्यवेक्षक लीना नागेशकर उपस्थित होत्या. दुहेरीतील विजयी व उपविजयी खेळाडूंना रूबी ट्रॅव्हल चे संचालक असिफ पटेल यांच्या तर्फे भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्र संचालन स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे सह सचिव राजीव देसाई यांनी केले.
निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: पुरुष गट:
समीर बॅनर्जी (अमेरिका)[6]वि.वि.रेचटमन विन्सिगुएरा, डब्ल्यू(स्वीडन)3-6, 6-3, 6-1; करण सिंग (भारत)(3)वि.वि.थानापट चॅनता(थायलंड) 7-6(3), 6-2;
दुहेरी: अंतिम फेरी:
दक्षिणेश्वर सुरेश (भारत)/मनीष सुरेशकुमार(भारत)वि.वि. आदिल कल्याणपूर (भारत)[2] / रियुकी मत्सुदा(जपान) 6-3, 6-4;










