आज रविवारची सुट्टी असली तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दुष्काळा निमित्त सोलापूर जिल्ह्याचा दौरा आयोजित केला आहे. सांगोला तालुक्यातील तिसंगी तसेच माढा तालुक्यातील तुळशी, अरण या ठिकाणी पालकमंत्री दुष्काळाची पाहणी करणार आहे. त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासनाची टीम राहणार आहे. गेल्याच आठवड्यात पाणी प्रश्नाकडे राज्यकर्ते दुर्लक्ष करतात या कारणासाठी तुळशी ग्रामस्थांनी गाव विकणे आहे असा बोर्ड लावून राज्यभर धमाका केला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्तिकीयेन यांनी या गावाला भेट दिली. गावाच्या आजूबाजूलाच उजनीचे दोन कॅनल आहेत मात्र राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे या गावात पाणीपुरवठ्याची ठोस उपाययोजना केली नाही. निवडणूक जवळ आली की पाणी येते आणि नंतर सर्वच जण दुर्लक्ष करतात. त्यामुळे गावकऱ्यांनी अनोखा फंडा राबवून महाराष्ट्राचे लक्ष वेधले. आज पालकमंत्री या गावाला भेट देऊन काय आश्वासन देतात याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे उजनी धरणात सध्या 95 टक्के पाणी असून केवळ ठराविक आमदाराच्या इच्छे खातर या पाण्याचा अपव्यय सुरू आहे. 15 जुलै पासून उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात आहे. आणखी सहा महिने दुष्काळाचे भयानक संकट असणार आहे, त्यामुळे आता हे कालव्यातून सोडण्यात येत असलेले बेसुमार पाणी बंद करावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे हे याबाबत काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.









