सोलापूर- महाराष्ट्रातील पारंपरिक कला,भक्ती-संगीत आणि लोककलांना नव्या पिढीशी जोडण्यासाठी झीतर्फे ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील सहा शहरांमध्ये होणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात ३१ ऑक्टोबरला ठाण्यातून होणार आहे.त्यानंतर २१ नोव्हेंबरला पुणे,२८ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर,५ डिसेंबरला नाशिक,१२ डिसेंबरला कोल्हापूर आणि १९ डिसेंबरला सोलापूर येथे महोत्सव रंगणार आहे.प्रत्येक शहरातील स्थानिक कलेला या कार्यक्रमात विशेष स्थान देण्यात आले असून ठाण्यात तारपा,पुण्यात जोगवा नृत्य,छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थानिक लोककला, नाशिकमध्ये पारंपरिक लोकसंगीत,कोल्हापुरात पोवाडा,तर सोलापुरात भारूड सादर केले जाणार आहे.स्थानिक कलाकारांनाही या मंचावर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाचे विशेष आकर्षण ‘अभंग रिपोस्ट’ असून पारंपरिक अभंगांना आधुनिक संगीताचा साज देत ते सादर केले जाणार आहेत.प्रसाद जवादे आणि शिवानी सोनार सूत्रसंचालन करणार आहेत.‘सा रे ग म प’मधील नव्या गायक-कलाकारांनाही मंच मिळणार आहे.हेमा व्ही.आर. आणि अलंकार पाठारे यांनी ‘नादोत्सवम’च्या संकल्पनेची माहिती दिली.
सोलापूरात भारूड कलेचे विशेष सादरीकरण
१९ डिसेंबरला सोलापुरात ‘नादोत्सवम’चा सोहळा रंगणार असून भारूड कलेचे विशेष सादरीकरण होणार आहे. स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळणार असल्याने सोलापुरातील रसिकांसाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम विशेष ठरणार आहे.











