सोलापूर :जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती, सामाजिक-सांस्कृतिक संस्था आणि नागरिकांनी या डिजिटल लोकचळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा, परंपरा, पाककृती, आरत्या व छायाचित्रे ‘बाप्पा डॉट ओआरजी’(bappa.org)वर अपलोड करून सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवातील परंपरा, कला, विधी आणि आठवणींचे डिजिटल स्वरूपात जतन करून जागतिक पटलावर मांडण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने या उपक्रमातून कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, मूर्तिकला, आरत्या आणि लोककलांचे डिजिटल दस्तऐवजीकरण होणार आहे. पुरातत्त्व संचालनालयाने विकसित केलेल्या या मंचावर नागरिकांना घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील छायाचित्रे, व्हिडिओ, पाककृती, आरत्या आणि परंपरा अपलोड करता येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
सोलापूरचा वारसा जागतिक पटलावर सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची वैशिष्ट्ये, स्थानिक सजावट, खाद्यसंस्कृती, मूर्तिकला आणि लोककलांची नोंद करून जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख देश-विदेशात पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे स्थानिक कलावंतांना व्यापक ओळख मिळेल तसेच सांस्कृतिक व आध्यात्मिक पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी म्हटले.
सहभाग नोंदवा – प्रमाणपत्र मिळवा या अभियानात माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी संकेतस्थळावर जाऊन ‘तुमची कथा सांगा’ या पर्यायातून कथा, पाककृती, परंपरा किंवा थेट आरती यांची माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.










