रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहाला मोठी चालना मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.या करारामुळे दिघी येथे प्रमुख जहाजबांधणी केंद्र उभारण्यात येणार असून, राज्यात सुमारे ९० हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.
या प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. तसेच प्रतिवर्ष किमान १.२ दशलक्ष सकल टनभार जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती महाराष्ट्रातच करणे शक्य होणार आहे.महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र सरकारच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे देशातील जहाजबांधणी क्षमता वाढण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसेच कुशल रोजगारनिर्मिती आणि जागतिक सागरी क्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता वाढविण्यासही मोठी मदत होणार आहे.











