टाळ मृदुंगाचा गजर करत… विठू माऊलीच्या जयघोषात आज सायंकाळी संत शिरोमणी सावता महाराज मंदिरासमोर हजारो भक्तांच्या उत्साही वातावरणात श्रीफळ हंडी सोहळा पार पडला. सायंकाळी चार वाजल्यापासून श्रीफळ हंडी बांधण्याचे काम सुरू झाले.सुमारे 15 ते 20 हजार नारळ या हंडीला बांधण्यात आले. त्यानंतर संत तुकाराम महाराजाचे वंशज ह.भ.प.बाळासाहेब देहूकर यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली. श्रीफळ हंडीला देण्यात येणारे झोके… काठी मारून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणारे देहूकर महाराज…. आणि या श्रीफळ हंडीचे नारळ घेण्यासाठी तरुणांची उडालेली चित्त थरारक झुंबड असा हा सोहळा लक्षवेधी ठरला. श्रीफळ हंडी फोडल्यानंतर तोफांची सलामी देण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाविकांनी मोठी गर्दी केली होती.पंढरपूरची आषाढी वारी संपल्यानंतर पांडुरंगाची पालखी आपल्या लाडक्या भक्ताला म्हणजेच संत सावता माळी यांच्या भेटीला दरवर्षीप्रमाणे सोमवार आली. काल संत शिरोमणी सावता महाराज यांची 731 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. श्रीफळ हंडी सोहळ्यानिमित्त संत शिरोमणी सावता महाराज तसेच पंढरपूरहुन आलेली पांडुरंगाची पालखी मंदिरासमोर ठेवण्यात आली होती. सोहळ्यानिमित्त सकाळपासून दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. अरणच्या या यात्रेनिमित्त विविध मनोरंजनांचे स्टॉल्स, तसेच दुकाने थाटण्यात आली आहेत. यंदाच्या यात्रेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली.








