दत्त इंडिया शुगरच्या टोळ्या पंढरपूरमध्ये दाखल; ऊसतोडणीला सुरुवात, सोलापूरच्या कारखानदारांसमोर आव्हान

येस न्यूज मराठी: सोलापूर जिल्ह्यात ऊसदराचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस आता परराज्यात जाऊ लागला आहे. कर्नाटकातील दत्त इंडिया शुगर कारखान्याने पंढरपूर परिसरात आपल्या ऊसतोडणी टोळ्या पाठवल्या असून, प्रतिटन ३७०० रुपये दराने ऊस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या दराने शेतकऱ्यांना बिल मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्याप अनिर्णित आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिटन ३२५० रुपये पहिली उचल आणि त्यानंतर २०० रुपये, असे एकूण ३४५० रुपये देण्याबाबत आदेश काढले आहेत. मात्र, जिल्ह्यातील कारखानदारांकडून या दराची अंमलबजावणी करण्यास अद्याप तयारी दर्शवली नाही.
त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आपला ऊस जिल्ह्याबाहेर आणि परराज्यात पाठवण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. यंदा ऊसाची संभाव्य टंचाई लक्षात घेता परजिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून ऊसाला चांगली मागणी आहे. त्यातच प्रतिटन ३७०० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल कर्नाटकातील कारखान्यांकडे वाढत आहे.
एकीकडे सोलापूर जिल्ह्यात ऊसदरावरून संघर्ष सुरू असताना दुसरीकडे शेजारील राज्यातील कारखाने अधिक दर देऊन ऊस घेऊन जात असल्याने सोलापूरमधील साखर कारखानदारांसमोर ऊस उपलब्धतेचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तोडगा काढूनही कारखानदार त्यांचे ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून ऊसदराचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी पुढे येत आहे.









